“शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा मराठेशाहीतच नव्हे तर सबंध भारतवर्षात सर्वार्थाने कुणी चालवला असेल, तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनीच ! ” अशा शब्दांत इतिहास अभ्यासक व कार्यक्रमाचे वक्ते रविराज पराडकर (Raviraj Paradkar) ह्यांनी दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलातील ज्ञानविहार ग्रंथालय, बोरीवली येथील इतिहास कट्ट्यावर लोकमातेचा गौरव केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठी रंगभूमीचे बोरीवलीतील ज्येष्ठ सिनेनाट्य कलावंत नारायण जाधव आणि इतिहास कट्ट्याची सह-आयोजक संस्था, बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे उपाध्यक्ष सुनील गणपुले, कार्यकारी समिती सदस्य संजीव राणे व कोंकण प्रांत समितीच्या महिला प्रमुख हेमा तन्ना व अन्य महिला सदस्यांच्या हस्ते, अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
(हेही वाचा – cyber security course in hyderabad : हैदराबाद सायबर सिक्युरिटी कोर्सची फी किती आहे?)
तसेच, वक्ते रविराज पराडकर (Raviraj Paradkar) व प्रमुख पाहुणे नारायणराव जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. अहिल्याबाईंच्या पुण्यस्मरणप्रसंगी प्रमुख पाहुणे नारायण जाधव यांनी इतिहास कट्टा उपक्रमाचे कौतुक करताना, अहिल्याबाईंच्या जीवन कार्याचा आदर्श बाळगून भारताची स्त्रीशक्ती बलवान व्हावी अशी आशा प्रकट केली. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त इतिहास कट्ट्यावर आयोजित या विशेष कार्यक्रमांत पुढे बोलताना, रविराज पराडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू त्यांनी उपस्थितांसमोर उलगडले.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात त्यांनी अहिल्याबाईंच्या जीवनातील कितीतरी प्रसंगाचे शब्दचित्रण केले. अहिल्याबाईंनी एका प्रसंगी, “मी आज जें काहीं सामर्थ्याच्या व सत्तेच्या बळावर करीत आहें त्याचा मला परमेश्वरापाशीं जाब द्यावा लागेल” या सुप्रसिद्ध उद्गारांची त्यांनी आठवण करून दिली. “त्यानंतर बोलताना रविराज (Raviraj Paradkar) म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनी इंदुर राज्याचा सर्वार्थाने विकास केला आणि होळकरशाहीच्या खाजगी मालमत्तेतून भारतभर मंदिरे, धर्मशाळा, वाडे, घाट, विहिरी, तलाव, अन्नछत्रे उभारून असंख्य धर्मकार्ये अहिल्याबाईंनी चालवली. वैयक्तिक जीवनातील दुःखांचे डोंगर पेलतानाही, कठोर आणि कर्तव्यदक्ष असणारी ही स्वामिनी गोरगरीबांसाठी पदरची पै न पै देऊन टाकणारी लोकमाता झाली. त्याकाळी भारतभराचे सर्व राजे आणि सत्ता स्वार्थी राजकारणाने बरबटलेल्या असताना, त्यांचा डामडौल-आपपपसातील चढाओढ, ब्रिटीशांची फोडफोडी सुरु असताना आपल्या अजोड चारित्र्याने आणि सुशील स्वभावाने अहिल्यादेवींनी आपले राज्य अबाधित ठेवले. मराठेशाहीशी आणि छत्रपती-पेशवे यांच्याशी एकनिष्ठ राहून, अंगीभूत मुत्सुद्दी स्वभावाने त्यांनी आपल्याविरुद्ध झालेल्या प्रत्येक राजकारणाला तोडीस तोड उत्तर दिले.
(हेही वाचा – MVA च्या जागा वाटपात मुंबईत काँग्रेस, उबाठा तोट्यात; तर पवार गट ना नफ्यात ना तोट्यात)
सुभेदार मल्हारराव आणि गौतमाबाई यांच्या तालमीत तयार झालेल्या अहिल्याबाईंनी आदर्श युद्धनीती, अर्थनीती, धर्मनीती आणि समाजोद्धारक राजनीतीचा वस्तुपाठ घालून दिला. उदात्त धोरणे, प्रशासन, शेती, व्यापार, उद्योग, कला-कौशल्य विकास, पाणीव्यवस्था, न्यायव्यवस्था, स्त्रीहक्क, परराज्यसंबंध, अशा नानाविध बाजूंनी त्यांनी आपल्या राज्यात सर्वदूर सुधारणा केल्या. वैयक्तिक सुखभोगापेक्षा राज्यातील शांतता, सुरक्षितता आणि प्रजाहित त्यांनी सर्वतोपरी मानले. मध्ययुगीन कालखंडातील सर्वांत यशस्वी राज्यकर्ती म्हणून इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. आजच्या युगातील प्रत्येक स्त्रीला त्यांच्या चरित्राच्या अभ्यासातून प्रेरणा मिळेल आणि स्त्रीशक्तीच्या अनेक आयामांतून सर्व क्षेत्रांत त्या अग्रेसर होतील, असा विश्वास पराडकर (Raviraj Paradkar) यांनी शेवटी व्यक्त केला.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने आयोजित, जनसेवा केंद्र प्रायोजित इतिहास कट्ट्यावरील ‘गोष्ट ती ची’ या दुसऱ्या पर्वातील मराठे कालखंडाची ही पहिली गोष्ट होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गणपुले यांनी केले तर पूजा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी उपस्थित साऱ्या प्रेक्षकांनीही अहिल्याबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले आणि लोकमातेला भावांजली वाहिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community