‘हमास’च्या हल्ल्यानंतर बंद केलेली इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर शनिवारी खुली केली. (Israel-Hamas War) त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली. सुमारे तीन हजार टन मदत साहित्य असलेली आणखी २०० वाहने इजिप्तची सीमा ओलांडून गाझाकडे निघाली होती. मदत सामुग्रीच्या २० वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. दुसरीकडे ही मदत सामुग्री गाझामधील मानवी संकटाच्या तीव्रतेच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे मदत पथकांतील स्वयंसेवकांनी सांगितले. (Israel-Hamas War)
(हेही वाचा – IOA CEO Appointment : ऑलिम्पिक असोसिएशनला लवकरच नवीन सीईओ मिळेल, पी टी उषा यांना विश्वास)
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांची इस्रायल भेट आणि काही मध्यस्थांच्या आठवडाभराहून सुरू असलेल्या मुत्सद्देगिरीनंतर गाझा-इजिप्त सीमा इस्रायलने खुली केली आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या सुमारे २०० लोकांची सुखरूप सुटका केल्याशिवाय कुठलीही मदतसामुग्री गाझामध्ये येऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतली होती. सुमारे ३ हजार टन मदतसामुग्री घेऊन आलेले आणि गेले अनेक दिवस सीमेजवळ उभे असलेले दोनशेहून अधिक ट्रक शनिवारी गाझाच्या दिशेने निघाले होते. सध्याच्या युद्धग्रस्त गाझातून सुटका करून घेण्यासाठी हजारो नागरिक इजिप्तमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेत सीमेवर आहेत.
गाझामध्ये २३ लाख पॅलेस्टिनी रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई बाम्ब हल्ले चालूच ठेवले असले तरी पॅलेस्टाईनमधून इस्रायलवर होणारा क्षेपणास्त्रांचा मारा रोखणे त्याला शक्य झालेले नाही. ‘हमास’ने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा चालूच ठेवला आहे. (Israel-Hamas War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community