अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ज्या व्यक्तीची वर्ल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी नेमणूक करतात, ती व्यक्ती आहे तरी कोण? राष्ट्रपती जो बायडन म्हणाले की, या ऐतिहासिक महत्वपूर्ण क्षणात विश्व बॅंकेचे नेतृत्व करण्यासाठी अजय बंगा हे सक्षम आहेत.
राष्ट्रपतींच्या या विधानानंतर अजय बंगा यांच्याविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली. ६३ वर्षीय अजय बंगा हे जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि सीईओ राहिलेले आहेत. भारतीय वंशाचे अजय बंगा यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी असून वैश्विक कंपन्यांच्या निर्मितीत आणि व्यवस्थापनात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे.
(हेही वाचा वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
जो बायडन म्हणाले की, ’अजय बंगा यांच्याकडे लोक आणि प्रणाली व्यवस्थापित करण्याचा आणि योग्य परिणाम देण्याचा अनुभव आहे आणि हा अनुभव त्यांच्या जगभरातील नेतृत्वासोबत कार्य करु मिळाला आहे.’ या वर्ल्ड बॅंकेत एकूण १८९ देशांचा सहभाग आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे.
अजय बंगा यांचा महाराष्ट्राशी जवळचा संबंध आहे, कारण त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे एका शिख कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय सेनेत निवृत्त लेफ्टनंट जनरल होते. अजय बंगा यांचं कुटुंब मूळचं पंजाबच्या जालंधरचं असून दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयआयएम अहमदाबाद येथे त्यांनी एमबीए पूर्ण केलं. अजय बंगा यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. असे अजय बंगा आता वर्ल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहेत ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
Join Our WhatsApp Community