अजय देवगणसह सेलिब्रेटींचा महापालिकेला पुन्हा एकदा मदतीचा हात!

कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महानगरपालिकेने २० रुग्‍णशय्या क्षमतेचे 'कोविड एचडीयू' रुग्‍णालय उभारले आहे.

160

मुंबई महापालिकेचे सेलिब्रेटी सहायक आयुक्त म्हणून ओळखले जाणारे किरण दिघावकर यांनी पुन्हा एकदा आपल्या ओळखीचा फायदा महापालिकेला मिळवून दिला आहे. धारावीमध्ये उभारण्यात आलेल्या २०० खाटांच्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याची मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या सिने अभिनेता अजय देवगण यांच्यासह इतरांच्या मदतीने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क परिसरातील स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये हिंदुजा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाखाली महापालिकेचे २० खाटांचे कोविडचे हाय डिपेन्डन्सी युनिट रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे आता हिंदुजा रुग्णालयातच दाखल होण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या या रुग्णालयात अॅडमिट होवून हिंदुजाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेता येणार आहे.

२० रुग्‍णशय्या क्षमतेचे ‘कोविड एचडीयू’ रुग्‍णालय उभारले!

कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्तर विभागाने २० रुग्‍णशय्या क्षमतेचे ‘कोविड एचडीयू’ (हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट) रुग्‍णालय उभारले आहे. अल्‍पावधीत उभारण्‍यात आलेल्‍या या रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन हिंदुजा रुग्‍णालयाकडून केले जाणार आहे. महानगरपालिकेच्‍या सभागृह नेता वि‍शाखा राऊत व अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) संजीव जयस्‍वाल यांनी बुधवारी या सुविधेची पाहणी केली. हे रुग्‍णालय लवकरात लवकर कार्यान्‍व‍ित करण्‍याचे निर्देश जयस्‍वाल यांनी द‍िले आहेत. या पाहणीप्रसंगी उपआयुक्‍त (परिमंडळ २) विजय बालमवार, जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर तसेच हिंदुजा रुग्‍णालयाचे वरिष्‍ठ जॉय चक्रवर्ती, जी/उत्‍तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्‍य) वीरेंद्र मोहिते हे उपस्थित होते.

(हेही वाचा : कोविशील्डची किंमत झाली कमी! राज्य सरकारांना मिळणार ३०० रुपयांत लस! )

दादरमधील स्काऊट-गाईड ताब्‍यात घेतला!

दादर परिसरातील रुग्‍णांसाठी देखील अतिदक्षता उपचार सुविधा निर्माण करण्‍याचे निर्देश जयस्‍वाल यांनी दिले होते. त्‍यानुसार जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर यांच्‍या प्रयत्‍नाने दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉल प्रशासनाने ताब्‍यात घेतला.  हे रुग्‍णालय उभारले जाणार असल्‍याची माहिती मिळताच त्‍यासाठी प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्‍या एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेला दिली आहे. यामध्‍ये अजय देवगण यांच्‍यासह  बोनी कपूर, समीर नायर, रजनिश खानुजा, दीपक धर, तरुण राठी, अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ित या सर्वांनी देखील वाटा उचलला आहे.

हिंदुजा रुग्‍णालय यांच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नांनी उपचार केले!

या कोविड रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी माहिम येथील पी.डी. हिंदुजा रुग्‍णालयाने महानगरपालिका प्रशासनाला लेखी होकार कळवला आहे. त्‍यामुळे हे कोविड एचडीयू रुग्‍णालय हे हिंदुजा रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारित विभागाच्‍या स्‍वरुपात कार्यान्‍व‍ित होणार आहे. या रुग्‍णालयासाठी सयंत्र, ऑक्सिजन पुरवठा, पाणी, वीज, सुरक्षा इत्‍यादी व्‍यवस्‍था महानगरपालिका पुरवणार आहे. तर हिंदुजा रुग्‍णालयाकडून  वैद्यकीय तज्‍ज्ञ, परिचारिका, इतर मनुष्‍यबळ तसेच रुग्‍णांसाठी कपडे, अन्‍न, औषधी इत्‍यादी बाबी द‍िल्‍या जाणार आहेत. मुंबई महानगरपालिका व हिंदुजा रुग्‍णालय यांच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नांनी व समन्‍वयाने या ठ‍िकाणी कोविड रुग्‍णांवर उपचार केले जाणार आहेत. मागील वर्षी कोविड करता याच स्काऊट अँड गाईडमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर अर्थात सीसीसी टू उभारण्यात आले होते. त्यानंतर ते बंद करण्यात आले होते. परंतु दादर व माहिममधील रुग्णांना आयसीयूमध्ये खाट उपलब्ध होताना येणाऱ्याा अडचणी लक्षात घेता जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी पुढाकार घेत हिंदुजा रुग्णालयाच्या मदतीने  २० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या २० खाटांपैकी पाच खाटा या व्हेंटीलेटरच्या तर  पंधरा खाटा या आयसीयूच्या असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.