Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून मांजरी बुद्रुक येथील विविध विकासकामांची पाहणी

मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द यांना जोडण्यासाठी मुळा मुठा नदीवर दोन पदरी पुलाचे काम सुरू आहे.

172
Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून मांजरी बुद्रुक येथील विविध विकासकामांची पाहणी
Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून मांजरी बुद्रुक येथील विविध विकासकामांची पाहणी

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी (२६ डिसेंबर) सकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बुद्रुक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणीपुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळा मुठा नदीवरील पुलांच्या विविध विकासकामांची पाहणी केली.

यावेळी पवार म्हणाले, मांजरी बुद्रुक परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ-पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी. आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाइपलाइन करावी. महानगरपालिकेने या योजनेचे उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करून या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी.

(हेही पहा – Indian Navy: अरबी समुद्रामध्ये नौदलाच्या ३ युद्धनौका तैनात, न्यायवैद्यक पथकाकडून तपासणी आवश्यक असल्याची सूत्रांची माहिती )

मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द यांना जोडण्यासाठी मुळा मुठा नदीवर दोन पदरी पुलाचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडीचा विचार करता या पुलाला समांतर चौपदरी पूल बांधण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. विकासकामाच्या पाहणी दौऱ्यानंतर पवार यांच्या हस्ते ससाणेनगर येथील सावित्रीबाई फुले आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करावे…
हडपसर मांजरी रस्त्यावरील मांजरी बुद्रुक येथे रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल बांधकामासाठी दोन्ही बाजूस लागणारी ५० मीटर जमीन भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा. या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. या पुलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येईल. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.