आता ‘हा’ निधी देखील आरोग्य व्यवस्थेसाठी, अजित दादांनी घेतला महत्वाचा निर्णय!

१५व्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावरील खर्चासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

123

राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देताना, कोरोना संसर्गीताच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर भर द्यावा. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी १५व्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावरील खर्चासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकरमायकोसीसच्या उपाययोजनांसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचाः कोरोना पॉझिटिव्ह असाल तर आता तुमची रवानगी होणार… जाणून घ्या कुठे ते?)

काय म्हणाले अजित दादा

राज्यातील शहरी भागातील कोरोना संसर्ग कमी होत असताना, ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी आशा वर्करना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात. ग्राम दक्षता समित्यांना अधिक क्षमतेने कार्यान्वित करावे. कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती अवजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याचे नियोजन करावे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.

म्युकरमायकोसीस रुग्णांवर त्वरित उपचार करा

म्युकरमायकोसीसच्या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरू केल्यास, हा आजार बरा होतो. त्यामुळे या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरू करण्यात यावेत, त्यामुळे या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही. म्युकरमायकोसीसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकरमायकोसीस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकरमायकोसीसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे, त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. मात्र रेमडेसिवीर प्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

(हेही वाचाः पवारांचे नातू नाचले ‘सैराट’… राजकारण झाले झिंग झिंग ‘झिंगाट’!)

रुग्णांची बिले तपासण्यासाठी ऑडिटरची नेमणूक

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. तसेच लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. राज्यात सुरू असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी. तसेच प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन वापराचे योग्य नियोजन करण्यात यावे. खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करावी, त्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यात यावी, असे देखील अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.