Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वीर सावरकरांच्या मराठीसाठीच्या योगदानाचा पंतप्रधानांनी संमेलनात केला गौरव

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान लाभले आहे - पंतप्रधानांचे गौरवोद्गार

62

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मराठी भाषेसाठी फार मोठे योगदान आहे. ते योगदान कुणीच नाकारू शकत नाही. वीर सावरकर (Veer Savarkar), गोपाळ गणेश आगरकर हे थोर व्यक्ती होते. त्यांच्यामुळे मराठी भाषा रुजत गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान लाभले आहे, अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वीर सावरकर यांच्या मराठीसाठीच्या योगदानाचा गौरव केला. ते नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.  (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

(हेही वाचा – महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यस्थेत 3 लाख कोटींची वृद्धी; CM Yogi Adityanath यांची विधानसभेत माहिती)

या प्रसंगी व्यासपिठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे, उज्वला मेहेंदळे, संजय नहार, प्रकाश पागे व्यासपिठावर उपस्थित होते. शरद पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आणि स्मरणिका देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली.

मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मराठीचे मी देशाच्या राजधानीत अतिशय मनापासून अभिवादन करतो. तसेच देशाच्या आ​र्थिक राजधानीतून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांनाही मी नमस्कार करतो. मराठी भाषेच्या साहित्य संमेलनाचे दिल्लीत गौरवशाली आयोजन होत आहे. हे एका राज्यापुरते मर्यादित नाही, तर स्वातंत्र्याच्या लढाईची झलक दर्शविणारे संमेलन आहे. मराठी ही संपूर्ण भाषा आहे. मराठीत जशी शूरता आहे तशीच वीरता आहे. मराठीत सौंदर्य आहे आणि सुंदरता आहे. मराठीत प्राचीनता आहे, तशीच आधुनिकता आहे. मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेची श्रीमंती दर्शविली.
साहित्य संमेलनाचा दिवस ऐतिहासिक
पंतप्रधान म्हणाले की, जगात १२ कोटी लोक मराठी बोलतात. या सर्वांसाठी साहित्य संमेलन ही एक पर्वणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला ३०० वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आज जागतिक मातृभाषा दिवसही आहे. यामुळे आयोजकांनी साहित्य संमेलनासाठी जो दिवस निवडला आहे तो सुध्दा ऐतिहासिक आहे. गुलामगिरीच्या काळात देशाला जेव्हा आध्यात्मिक उर्जेची गरज होती, तेव्हा महाराष्ट्रातील संतांनी ती पूर्ण केली, असेही ते मोदी म्हणाले.
मराठी शाळा टिकल्या, तर मराठी साहित्य टिकेल – शरद पवार

संमेलनाचे स्वागतध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, दिल्लीचे आणि महाराष्ट्रचे नाते अतूट आहे. नव्या पिढीला मराठी भाषा जपण्यासाठी प्रेरित करणे सगळ्यांचे कर्तव्य आहे. मराठी पुस्तके मोठ्या प्रमाणावर छापली जात आहेत. चांगल्या पुस्तकांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गावोगावी ग्रंथप्रदर्शने भरवली जात आहेत. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत. तरीसुद्धा नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली, तरच साहित्याला भवितव्य असेल. त्या दृष्टीने शाळेपासून प्रयत्न करावयास हवेत. यामध्ये शासनाबरोबरच शिक्षकांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, मराठी शाळा टिकल्या, तर मराठी साहित्य टिकेल. याचा विचार करून शिक्षकांनी त्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावयास हवेत. मुलांच्यामध्ये वाचनाची गोडी लागण्यासाठी विविध उपक्रम राबवायला हवेत, सकस वाचणारे वाचक वाढले पाहिजेत. तालुका, गावपातळीवर वाङ्मयीन उपक्रम वाढले पाहिजेत. गाव तिथे ग्रंथालय योजना पूर्वी होती. गाव तिथे ग्रंथप्रदर्शन हा उपक्रम राबवावला पाहिजे. युवा पिढी साहित्य व्यवहाराशी जोडून राहिली, तरच सुसंस्कृत आणि नव्या विचारांची पिढी साहित्याच्या माध्यमातून घडू शकेल, याचे भान ठेवायला हवे.

शिवाजी महाराज देखील मराठीसाठी आग्रही होते – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadanvis) म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले संमेलन असल्यामुळे त्याला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाजी महाराजांनी देखील मराठी भाषेचा आग्रह धरला होता. स्वभाषेचा स्वाभिमान बाळगणे आणि आग्रह धरणे आम्ही शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. मराठी माणसाने नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केले आहे. यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा संतांनी टिकविली आहे – तारा भवाळकर
या प्रसंगी बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर (Tara Bhavalkar) म्हणाल्या की, लोकभाषा आणि अभिजात भाषा म्हणजेच संमेलन होय. पंतप्रधान यांना भेट म्हणून देण्यात आलेली विठ्ठल रुक्मिणीची हे महाराष्ट्रचे दैवत आहे. शिवाय मराठी जनांच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच आमची मराठी आणि महाराष्ट्र देखील सर्वांना सांभाळून घेणारा आहे. आतापर्यंत सर्वच संतांनी मराठीचे कौतुक केले आहे. खरं तर अभिजात मराठीची पायाभरणी करण्याचे महत्त्वाचे काम संत मंडळीनी केले आहे. मराठी भाषा ही संतांनी टिकविली आहे. भाषा ही जिवंत गोष्ट आहे. भाषा जेवढी बोलली जाईल तेवढी जिवंत राहील. भाषा कधीच पुस्तकांमधून जिवंत राहत नाही. ज्या दिवशी आईने बाळासाठी पहिली ओवी गायली, त्या दिवशी खऱ्या अर्थाने मराठीचा जन्म झाला.  (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan )
हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.