परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने उपसले ‘शस्त्र’!

दरम्यान पूर्वी ठाणे पोलिस दलात असलेले पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २० एप्रिल रोजी पाठवले पत्र समोर आले आहे.

73

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचा आरोप करून राज्यात खळबळ उडवून देणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. परमबीर सिंग यांचे गुन्हेगारी जगताशी जवळचे संबंध असल्याचा आरोप पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी केल्यानंतर सध्या अकोला पोलिस नियंत्रण कक्षात असलेले पोलिस निरीक्षक भिराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे. १४ पानांच्या या तक्रार अर्जात घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीची माहिती दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत भर पडली असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हेगारी जगताशी सिंग यांचा थेट संबंध असल्याचा आरोप

मुंबई पोलिस विभागाचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्या १०० कोटीच्या कथित वसुलीच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात लेटरबॉम्बची प्रथाच सुरु झाली आहे. परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित आरोप केल्यानंतर एनआयएच्या अटकेत असताना सचिन वाझे याने देशमुख यांच्या विरुद्ध दुसरा लेटरबॉम्ब टाकला. या सर्व प्रकरणाचा तपास सुरु असताना गावदेवी पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आणि गुन्हेगारी जगताशी सिंग यांचा थेट संबंध असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी डांगे यांनी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांना दिलेल्या पत्रात आरोप करण्यात आले आहे, तसेच डांगे हे गावदेवी पोलिस ठाण्यात असताना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत न्याय मागितला होता. या प्रकरणाची चौकशी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

(हेही वाचा : आता नागरिकांना मिळणार ‘विशेष पोलिस अधिकार’! कसे? वाचा…)

गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीची माहिती नमूद 

दरम्यान पूर्वी ठाणे पोलिस दलात असलेले पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २० एप्रिल रोजी पाठवले पत्र समोर आले आहे. घाडगे हे सध्या अकोला पोलिस नियंत्रण कक्ष येथे कार्यरत आहे. त्यांनी लिहिलेल्या २० पानी तक्रारीत परमबीर सिंग यांच्या गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीची माहिती नमूद केली आहे. तसेच परमबीर सिंग हे २०१५ ते २०१८ याकालावधीत ठाणे पोलिस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे.

घाडगेंच्या पत्रात हे आहेत आरोप!

  • शासकीय अधिकाऱ्यांना एकच शासकीय निवासस्थान वापरण्याची परवानगी असते, मात्र परमबीर सिंग यांनी ठाणे आणि मलबार हिल येथे एकाच वेळी दोन शासकीय निवासस्थाने वापरून क्रिमिनल मिस्ककण्डक केले आहे, असा आरोप घाडगे यांनी केला आहे.
  • राज्यातील अनेक ठिकाणी परमबीर यांनी बेनामी मालमत्ता खरेदी केली आहे, तसेच एकट्या सिंधुदुर्गात २१ एकर जमीन परमबीर यांनी खरेदी केली असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे.
  • पोलिस दलातील बदल्यासाठी सिंग यांनी एजंट नेमले असून असून ठाण्यात असताना परमबीर सिंग यांनी रिव्हॉल्वर  परवानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये बेकायदेशीर कमवले असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. गंभीर गुन्ह्यात समरी करण्यासाठी मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप देखील घाडगे यांनी केला असून अनेक बांधकाम व्यवसायिकाकडे परमबीर यांनी हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक केली असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे. या सारखे अनेक आरोप घाडगे यांनी आपल्या पत्रात केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी करून परमबीर सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी घाडगे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.