गेल्या सहा दिवसांपासून विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेच्या प्रभावामुळे कमाल तापमानाचे नवनवीन रॅकोर्ड्स नोंदवले जात आहेत. विदर्भातील कमाल तापमानाची देशपातळीवरही नोंद घेतली जात आहे. रविवारी सलग दुस-या दिवशी अकोल्याचे कमाल तापमान सर्वात जास्त नोंदवले गेले. अकोल्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. संपूर्ण विदर्भात ६ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.
४० अंशांपुढे नोंदवण्यात आले तापमान
विदर्भातील बहुतांश भागांत कमाल तापमान पाच अंशाहून जास्त नोंदवले जात आहे. अकोल्या खालोखाल चंद्रपूरातील कमाल तापमानाचा क्रमांक लागला. चंद्रपूरात ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारी गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान चाळीस अंशापुढे नोंदवले गेले.
( हेही वाचा :सॅटलाईट टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्वभावाचे पॅटर्न जाणून घ्या…. )
विदर्भातील ४० अंशांपुढे गेलेले कमाल तापमान
- अकोला – ४४ अंश सेल्सिअस
- चंद्रपूर – ४३ अंश सेल्सिअस
- यवतमाळ – ४२.५ अंश सेल्सिअस
- ब्रह्मपुरी – ४२.२ अंश सेल्सिअस
- अमरावती आणि वर्धा – ४२ अंश सेल्सिअस
- वाशिम आणि बुलडाणा – ४१ अंश सेल्सिअस
- नागपूर – ४०.३ अंश सेल्सिअस
- गोंदिया – ४०.२ अंश सेल्सिअस