महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी विकास आराखड्यातील रस्ते, विद्यमान रस्त्यालगत मलवाहिनी टाकण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील मलनि:सारण कामे करण्यापूर्वी जमिनीचे संरेखन सर्वेक्षण (अलाईनमेंट सर्व्हे) आणि भौगोलिक तांत्रिक विश्लेषण (जीओ टेक्निकल ॲनालिसिस) करण्यात येणार आहे. यामुळे या दोन्ही प्रकारच्या सर्व्हेच्या अहवालानुसार काम केल्यास या मलनि:सारण प्रकल्पातील अडथळे दूर होऊन कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण होऊ शकतील. तसेच यामुळे रखडणाऱ्या प्रकल्पामुळे खर्चात वाढही होणार नाही,असे बोलले जात आहे.
मुंबई महानगरामध्ये सुमारे २ हजार २६ किलोमीटर लांबीचे मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली मलनि:सारण प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत. मलनि:सारण वाहिन्या नसलेल्या ठिकाणी नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकणे आणि वाहिन्यांचे अवर्धन करण्याची कामे मलनि:सारण प्रकल्पाचे उपप्रमुख अभियंता (नियोजन व संकल्प चित्रे) यांच्यामार्फत केली जातात.
(हेही वाचा अखेर लोअर परळ पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी झाली खुली)
मलनि:सारण प्रकल्प राबविताना अपुऱ्या भौगोलिक तांत्रिक विश्लेषण आणि संरेखन सर्वेक्षणामुळे बऱ्याच वेळा अडचणी उद्भवतात. मातीच्या गुणधर्माचा अंदाज वास्तविकतेत भिन्न आढळतो. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होण्याबरोबरच खर्चातही वाढ होते. या पार्श्वभूमीवर मलनि:सारण प्रकल्प विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी विकास आराखड्यातील रस्ते, विद्यमान रस्त्यालगत मलवाहिनी टाकण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मलनि:सारण वाहिन्या कोणत्या मातीवर टाकायची आहे, हे तपासले जाणार आहे. चाचणी खड्डे / चाचणी बोअर घेणे, मातीच्या थराचे विश्लेषण करणे आणि मातीची सुरक्षित वहन क्षमता निश्चित करणे आदी कामेही केली जाणार आहेत. त्यासाठी भौगोलिक तांत्रिक विश्लेषण (जीओ टेक्निकल ॲनालिसिस) आणि संरेखन सर्वेक्षण (टोटल स्टेशन सर्वेक्षण) प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. यात प्रामुख्याने भू-तांत्रिक तपास, तपशीलवार सर्वेक्षण आणि दिलेल्या जागेची जमीन मोजमाप यांचा समावेश आहे. ही कामे करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) संदीप कांबळे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community