सरकार पाडण्यासाठी मला ऑफर दिल्या!

यानंतरच्या काळात सूडबुद्धीने असे छापे टाकले जाणे वाढणार आहे. कुणी कितीही टार्गेट केले तरी घाबरण्याचे कारण नाही, आपण पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करू, असेही शरद पवार म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने सर्वोतोपरी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही, सरकार पाडण्यासाठी अनेक ऑफर देण्यात आल्या, मलाही या ऑफर आल्या, पण काही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर आलेल्या निराशेमुळे बदला घेण्याचे राजकरण सुरु आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.

सूडबुद्धीने पवार कुटुंबाला केले टार्गेट!

राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली, तेव्हा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता केंद्रातील ‘नंबर १’ आणि ‘नंबर २’ हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. अजित पवार आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरावर पडलेले छापे हा त्याचाच एक भाग आहे. यानंतरच्या काळात सूडबुद्धीने असे छापे टाकले जाणे वाढणार आहे. कुणी कितीही टार्गेट केले तरी घाबरण्याचे कारण नाही, आपण पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करू, असेही शरद पवार म्हणाले.

(हेही वाचा : निवडणुका नसल्याने सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळ बंद!)

महापालिका निवडणुकांची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवली!

यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. आगामी काळात जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 36 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता मेळावे घेतले जाणार आहे. तसेच आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आघाडीबाबत स्थानिक पातळीवरील गणिते बघून निर्णय घेतले जाणार असल्याचेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here