मुंबईतील सर्व जंबो कोविड सेंटर या महिना अखेर होणार बंद

मुंबईत दिवसाला सरासरी ३०० कोविड रुग्ण आढळून येत असले तरी यातील रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांची टक्केवारी ही एक टक्क्यांच्याही खाली आली आहे. त्यामुळे आता मुंबईत उभ्या असलेल्या जंबो कोविड सेंटरची आवश्यकताच नसल्याची बाब समारे आली आहे. मागील काही महिन्यांपासून जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल करण्याचे प्रमाणच घटले असून आता ही संख्या शुन्यावर आल्याने आता पुढील महिन्यांत हे सर्व कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

जंबो कोविड सेंटर या महिना अखेर होणार बंद

मुंबईत गुरुवारी २७३ कोविड रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत एकूण कोविड रुग्णांची संख्या ११ लाख २२ हजार १०९ एवढी आहे. या २७३ रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैंकी रुग्णदाखल असलेल्या रुग्ण खाटांची संख्या ही शुन्य पूर्णाक ९९ टक्के एवढीच आहे. त्यामुळे जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल करण्याचे प्रमाणही शुन्याच्या आसपास आल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून सेंटर सुरु ठेवणे योग्य ठरणार नाही. या जंबो कोविड सेंटरच्या नावाखाली महापालिकेच्या निधीचा अपव्यय होत असल्याने महापालिकेने कोविंड सेंटरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जंबो कोविड सेंटर बंद करण्याबाबत आरोग्य विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे फाईल पाठवली होती. यावर संजीव कुमार यांनी कोविड सेंटर बंद करण्याबाबत महापालिका आयुक्तांच्या परवानगीसाठी फाईल पुढे पाठवली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या मान्यतेनंतर येत्या ३१ जुलैपर्यंतच ही कोविड सेंटर सुरु ठेवण्यात येतील आणि पुढील कालावधीत ती बंद करण्यात येतील,अशी माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : मंकीपॉक्स विषाणू : संसर्गित देशातून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन)

महापालिकेच्यावतीने सध्या मालाड ( २२०० बेड), वरळी एनएससीआय (५०० बेड), रिचडसन अँड क्रुडास (१००० बेड) आणि मुलुंड ( १७०८ बेड) आदी चार जंबो कोविड सेंटर सद्यस्थितीत सुरु आहेत. त्यामुळे ही सर्व जंबो कोविड सेंटर येत्या काही दिवसांमध्ये बंद केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर बीकेसी जंबो कोविड सेंटरची जागा बुलेट ट्रेनच्या जागेसाठी आधीच ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याने तेही बंद करण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्व जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्ण नसल्याने लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here