गोपाल नीलकंठ दांडेकर… थोर इतिहासकार, किल्ले पर्यटक, आद्य गिर्यारोहक म्हणून संपूर्ण भारतवर्षाला परिचीत आहेत. आपल्या लेखणीतून गो.नी.दांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जिवंत केला आहे. पण इतिहास लेखन म्हणजे केवळ बोरुबहाद्दरी नाही. वेड लागल्याशिवाय जसा इतिहास घडत नाही, तसा तो मांडताही येत नाही. गो.नी. दांडेकरांनी इतिहास लिहिला नाही, तर तो जगवला.
सह्याद्रीच्या कडेकप-यांत दिमाखात उभे असलेले किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. त्यामुळे हे किल्ले केवळ पहायला नाही, तर जगायला शिकलं पाहिजे यासाठी गो.नी.दा आयुष्यभर झटले. त्यांच्या याच इतिहास वेडाचं दर्शन घडवण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून ‘किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. शुक्रवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे या माहितीपटाचा किल्लेप्रमींना आस्वाद घेता आला. गो.नी.दांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीयाला इतिहासाकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळावी यासाठी हा माहितीपट तयार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)
किल्ल्यांची दुर्दशा थांबवण्यासाठी दिशा मिळावी
किल्ले पर्यटनाला एक वेगळा दृष्टिकान देण्यासाठी आद्य गिर्यारहोक गो.नी.दांडेकर यांची महती सांगणारा 40 मिनिटांचा माहितीपट अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून तयार करण्यात आला आहे. गोनीदांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या अनेकांनी या माहितीपद्वारे त्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. महाराष्ट्रात किल्ले पर्यटनाची संस्कृती रुजणं अत्यंत आवश्यक आहेत. तोरणा किल्ला जिंकूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. याच किल्ल्यांच्या जोरावर महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न साक्षात उतरलं. महाराष्ट्राच्या सोनेरी इतिहासाचे किल्ले हे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पण अलिकडच्या काळात किल्ले हे केवळ फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे किल्ले पर्यटनाला एक वेगळी दिशा मिळाली तर किल्ल्यांची होत असलेली दुर्दशा सुधारायला मदत होईल, हा संस्थेचा या माहितीपटामागचा मुख्य हेतू आहे.
गो.नी.दांच्या दृष्टीतून किल्ले पहायला हवेत
गो.नी.दांनी किल्ले पर्यटनावर आधारित लिहिलेल्या असंख्य पुस्तकांतून सह्याद्रीकडे पहाण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला दिली आहे. किल्ले पाहताना त्यांची एक तंद्री लागायची, प्रत्येक वेळी किल्ले पाहताना त्यांच्या चेह-यावर एक विलक्षण आनंद दिसायचा. गडकिल्ल्यांच्या प्रत्येक वाटा त्यांना महाराजांच्या मावळ्याप्रमाणे पाठ होत्या. त्यामुळे किल्ले पहायचे असतील तर गो.नी.दांच्या दृष्टीतून पहायला हवेत, ही दृष्टी महाराष्ट्राला देण्यासाठीच हा माहितीपट तयार करण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दणका! रत्नागिरीतील वीर सावरकर शाळेच्या दुर्दशेवर मंत्री उदय सामंतानी बोलावली बैठक)
देशभरात माहितीपटाचे प्रदर्शन करण्याचा मानस
2 एप्रिल 2022 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व सदस्यांनी स्वखर्चाने हा माहितीपट तयार केला आहे. हा माहितीपट महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोफत दाखवण्यात येत आहे. शालेय मुलांमध्ये किल्ल्यांबाबत गोडी निर्माण व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये हा माहितीपट दाखवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. तसेच महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशभरात गो.नी.दांचं कार्य पोहोचावं यासाठी हिंदी आणि इंग्रजीतही हा माहितीपट प्रदर्शित करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी स्वेच्छेने अखिल महाराष्ट्र महासंघाला अर्थसहाय्य करण्याचे आवाहन देखील करण्यात येत असल्याचे या संस्थेचे सदस्य आशिष भंडारी यांनी सांगितले.
संस्थेचे समाजकार्य
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही संस्था किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करत आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये शाखा असून हजाराच्यावर सदस्य आहेत. संस्थेच्या वतीने समाजकार्यही करण्यात येत आहे. कोरोना काळात संस्थेने अनेकांना मदत केली आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांना सुखरुप ठेवण्यासाठी देखील संस्थेकडून मोहीम राबवण्यात येते.
(हेही वाचाः कोविड काळातही भारतातली गरिबी कमी करणारी ‘ही’ योजना तुम्हाला माहीत आहे का?)
शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे, सचिव राजन बागवे, कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community