वनस्पती, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पामोलिनचे घाऊक आणि किरकोळ दर या आठवड्याभरात कमी झाले आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होण्यास सुरुवात झाली असून खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्यास महागाई कमी होण्यास मदत होईल, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. हैदराबाद येथील कंपनी जेमिनी एडिबल्स अँड कंपनीने गेल्या आठवड्यात त्यांच्या सूर्यफूल तेलाच्या १ लिटर पाऊचच्या एमआरपीमध्ये १५ रुपयांची कपात केली होती.
खाद्यतेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी कमी
सर्व प्रमुख खाद्यतेलाच्या ब्रँड्सनी १० ते १५ रुपयांनी किमती कमी केल्या आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून नियमित देखरेख, सर्व सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत घट झाली आहे. असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी खुशखबर! SBI बॅंकेच्या सहकार्याने सरकार देणार नवी सुविधा )
सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात आणि इंडोनेशियाकडून निर्यात बंदी हटवण्याबरोबरच सरकारने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे खाद्यतेल कंपन्यांना किरकोळ किमती कमी करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक पुरवठ्यातील सुधारणा आणि टॅरिफ रेट कोटा (TRQ) कार्यान्वित झाल्याचा परिणाम कच्च्या खाद्यतेलाच्या घसरलेल्या किमतीवर दिसत असून किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे . पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क कमी करण्याबाबत अलिकडेच सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच वस्तूंच्या किमती नियंत्रणात येण्यास मदत होईल असेही पांडे यांनी सांगितले.