राज्य सरकारची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही आता अधिक व्यापक करण्यात आली असून राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक नागरिकांना लागू करण्यात आली आहे. राज्यातील एकूण अंगीकृत रुग्णालयांची संख्या १,३५० झाली असून सर्व लाभार्थी नागरिकांचे आरोग्य कवचही दीड लाख रुपयांऐवजी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. मागील महिन्यात २८ जून रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवार, २८ जुलै रोजी सुधारित योजनेचा शासन निर्णय तपशीलवार जाहीर केला. केंद्र सरकारच्या योजनेसोबत सुधारित स्वरूपात राज्याची जनआरोग्य योजना राबवण्यात येणार असल्याने अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणेच प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच. एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांतील समाविष्ट उपचारांचा लाभ. सध्या फुले योजनेत ९९६ तर, प्रधानमंत्री योजनेत एक हजार २०९ उपचार. त्यात वाढ केल्याने आता दोन्ही योजनांत प्रत्येकी एक हजार ३५६ उपचारांचा समावेश. १,३५६ उपचारांपैकी ११९ उपचार शासकीय रुग्णालयांसाठी राखीव. एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची एकूण संख्या एक हजार. फुले योजना याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांत १४० आणि कर्नाटक राज्यातील दहा अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त दोनशे रूग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आल्याने अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार ३५०. सर्व शासकीय रुग्णालये अंगीकृत करण्यात आली असून यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालयेही त्यांची इच्छा असल्यास एकत्रित योजनेत अंगीकृत केली जाणार.
(हेही वाचा Russia-ukraine War : युक्रेनचा रशियावर भीषण बॉम्ब हल्ला)
Join Our WhatsApp Community