आजकाल आरोग्याविषयी बरीच जागरूकता आली आहे. (World Health Day) अॅलोपॅथीचे (Allopathy) दुष्परिणामही समोर येत आहेत. असे असले, तरी काही वेळा संभ्रम निर्माण होतो की, आयुर्वेदिक उपचार घ्यावे कि अॅलोपथी उपचार घ्यावेत ? काही वेळा २ पॅथीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यामध्ये बरेच अंतर असते, त्याची प्राथमिक कारणमीमांसा करण्यासाठी बोरीवली, मुंबई येथील ओम आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरच्या संचालक डॉ. संध्या कदम यांच्याशी केलेली ही बातचित…
(हेही वाचा – धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही; Raj Thackeray, Jitendra Awhad यांच्याविरोधात संत समितीच्या बैठकीत ठराव)
आयुर्वेद रोगाचे समूळ उच्चाटन करतो; म्हणजे काय करतो ?
सिम्टम्स आणि ट्रीटमेंट असे आयुर्वेदाचे स्वरूप नाही. व्याधी समूळ नष्ट करण्याकडे आयुर्वेदाचा कल आहे. आयुर्वेदात त्रिविध परीक्षा म्हणजे दर्शन (निरीक्षण), स्पर्शन (स्पर्श) आणि प्रश्न (विचारणे), दशविध परीक्षा इत्यादी उपायांमार्फत रोगाचे निदान करण्यासाठी रुग्णाची तपासणी करणे, असे सांगितले आहे. चिकित्सा करताना आम्ही प्रकृती परीक्षण करतो. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे आयुर्वेदिक वैद्य रुग्णाच्या प्रकृतीला अनुसरून उपचार देतात. त्यासह इतर परीक्षणही केले जाते. देशकालाचाही विचार केला जातो. मुंबईत रहाणाऱ्या व्यक्तीला होणारे आजार वेगळे असतील आणि कोणी गुजरातमध्ये राहत असेल, तर तिथल्या वातावरणाप्रमाणे त्याला होणाऱ्या व्याधी वेगळ्या असतील. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. काळ म्हणजे ऋतू, महिना कुठला आहे, हेही महत्त्वाचे आहे. वसंत ऋतू मध्ये एलर्जीक ब्रोंकायटीस सारखे आजार होतात. हिवाळा किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला वात वाढलेला असतो अशावेळी वाताचे विकार बळावतात, याचाही विचार आयुर्वेदात केला जातो. निदान परिवर्तन म्हणजे रुग्णांची हिस्ट्री तपासून व्याधीची कारणे शोधून निदान परिवर्तन करणे म्हणजे चिकित्सेचे एक महत्त्वाचे साधन. अशा प्रकारे चिकित्सा करून मूळ कारणापर्यंत पोहोचलो की, रोगाची लक्षणे कमी होण्यासोबत त्याच्या मुळ कारणांचेही निराकरण होते.
कोणत्या आजारासाठी कोणत्या पॅथीकडे जावे ?
काही वेळेला असे विचारले जाते की, हार्ट अटॅक आला, तरी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाणार का ? किंवा कॅन्सर झाला तर आयुर्वेदिक उपचार घेणार का ? हा प्रश्न तेव्हा येतो, तेव्हा लक्षात घ्यायला हवे, आयुर्वेदामध्ये आत्ययिक अवस्था आणि आत्ययिक चिकित्सा (emergency treatment) सांगितलेली नाही, असे मुळीच नाही. चरक सुश्रुत संहितेमध्ये आत्ययिक चिकित्सा आणि आत्ययिक अवस्था उपचार सांगितलेले आहेत. त्या एक प्रोटोकॉल त्याचा ठरलेला नाही किंवा त्याची सध्याच्या काळात पडताळणी झालेली नाही. अशा वेळी अॅलोपथी ट्रीटमेंट घेणे, रुग्णालयात अॅडमिट करणे चूक नाही; कारण रुग्णाचा जीव वाचवणे हे वैद्याचे सगळ्यात पहिले कर्तव्य असते.
कोविडच्या काळात आम्ही अनेक रुग्णांना आयुर्वेदिक औषधांनी बरे केले आहे. मी स्वतः कोविडमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आहे. संपूर्ण उपचारांत मला काही औषधे ॲलोपॅथीची घ्यावी लागली; काही वेळा आपल्याला आयुर्वेदिक उपचारांपेक्षा ॲलोपॅथी उपचार घेणे गरजेचे असू शकते. त्या वेळी आपण ॲलोपॅथीची नक्कीच मदत घ्यायला पाहिजे.
एक सामान्य गैरसमज असा आहे की, आयुर्वेद फक्त जुनाट आजारांसाठी आहे, परंतु हे चुकीचे आहे. अनेक आशुकारी व्याधींवर आयुर्वेदामध्ये उपचार सांगितले आहेत, शास्त्रीय ग्रंथांमध्ये आपत्कालीन उपचारांचे वर्णन केले आहे. आयुर्वेदाची तत्वे आणि पद्धती, सौम्य ते मध्यम आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.
आयुर्वेद उच्च ताप, तीव्र दम्याचा त्रास, उचकी, उच्च रक्तदाब, रक्तदाब कमी होणे, अतिसार आणि पचनसंस्थेचे आजार यातील आत्ययिक आजारांवर देखील उपचार करतो. सद्य वमन, नस्य, बस्ती हे पंचकर्म उपचार आणि अनेक औषधी कल्पना आत्ययिक चिकित्सा करताना वापरले जातात. याशिवाय आयुर्वेद उपचार पद्धती अनेक व्याधींमध्ये उपयुक्त ठरते. जसे पचनसंस्थेचे विकार, श्वसन संस्थेचे विकार, त्वचा विकार, हृदयविकार आणि लाईफ स्टाईल डीसॅार्डर्स इत्यादी
ब्युटी ट्रीटमेंट्स, कॉस्मेटिक्स आणि स्किन ट्रीटमेंट्स, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन्स याच्यामध्ये आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने काम करतो.
आमवातासारखे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स (Auto immune disorders) आयुर्वेदिक पद्धतीने समूळ निराकरण होऊ शकतात. लाईफ स्टाईल डिसऑर्डर्स (Life style disorders) म्हणजे उच्च रक्तदाब, मधूमेह यांसारख्या रोगांमध्ये इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून अॅलोपॅथी औषध घ्यावी लागतील; पण ते पुढे वाढू नये किंवा ते आटोक्यात यावे, यासाठी आयुर्वेदाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळल्या तर चांगला परिणाम दिसून येतो.
अतिचिंता, तणाव, अनिद्रा यांसारख्या मानसिक आजारांमध्येही आयुर्वेदीय औषधांचा व पंचकर्म उपचार पद्धतीचा चांगला परिणाम होतो.
आपण आयुर्वेदीय उपचारांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चांगल्या पद्धतीने लाभ करून घेऊ शकतो. उच्च रक्तदाब, मधूमेह, लठ्ठपणा, हृदयविकार यांसारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, याच्यामध्ये आयुर्वेदिक शमन चिकित्सा म्हणजे औषधी चिकित्सा आणि त्याच्याबरोबरच पंचकर्म चिकित्सा खूपच चांगल्या पद्धतीने काम करतात.
लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, ऑटो इम्युन डिसऑर्डर्सवर आम्ही खूप काम केले आहे. आमवातावर पंचकर्माच्या साहाय्याने आम्ही उपचार करतो, त्याने वंध्यत्व, लैंगिक समस्यांमध्येही फायदा होतो. गर्भावस्थेतील आहार, औषधोपचार, जीवनशैली याबरोबरच बालरोगांचे उपचार आयुर्वेद औषध प्रणालीद्वारे करता येतात.
कॅन्सरसारखे आजार आयुर्वेदाने बरे होतात का ?
कॅन्सर म्हणजे काय तर अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन आणि अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ. या सगळ्याचं जे मूळ कारण आहे, ते वात पित्त, कफ आणि अग्नी यातला विशेषतः वात दोषातील असमतोल. सेल डिव्हिजन हे फंक्शन वाताच्या अंतर्गत येते.
अशा वेळी जर शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म चिकित्सा (Panchakarma Therapy) जर केली आणि त्याच्याबरोबर काही औषधी द्रव्ये दिली, तर कॅन्सर उपचारही आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून करू शकतो. बऱ्याचदा इतर कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये बरे होण्याची आशा सोडून आलेल्या रुग्णांना आम्ही चिकित्सा करून उपचार देतो. त्याने त्यांचा जीवन कालावधी नक्कीच वाढतो, लक्षणे कमी होतात. काही वनस्पती अँटीकॅन्सर म्हणून आता मान्यता पावत आहेत उदा. हळद, अश्वगंधा, त्रिफळा , तुळस, गुळवेल इत्यादी. आयुर्वेदामध्ये रसकल्प वापरले जातात. ते टार्गेटथेरपीप्रमाणे काम करतात. ही औषधे विशिष्ट स्थानापर्यंत पोहोचून त्या त्या ठिकाणी काम करतात . त्यामुळे बऱ्यापैकी कॅन्सरची लक्षणे कमी व्हायला मदत होते. केमोथेरपीच्या बरोबरीने आणि केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरतात. आमच्या पंचकर्म सेंटरमध्ये कॅन्सरवर आम्ही काम केलेले आहे आणि आम्हाला सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
तापावर आयुर्वेदिक आणि अॅलोपथी उपचारांमध्ये फरक कसा ?
तापला आयुर्वेदाने खूप महत्त्व दिले आहे. आयुर्वेदाने व्याधींचे वर्णन करतांना ताप पहिला सांगितला आहे. अनेक व्याधीमध्ये लक्षण म्हणून ताप येतो. उदा कोविड सारखी वायरल इन्फेक्शन्स, कुठेलेही बॅक्टेरिअल इन्फेक्शन जसे टायफॅाईड, स्किन इन्फेक्शन वगैरे. तापावर योग्य उपचार करता आले, तर पुढे होणारे जे संभाव्य धोके आहेत, ते टाळता येतात.
अँटीबायोटिक्स (Antibiotics) आणि इतर औषधे घेऊन ताप बरा होतो किंवा व्हायरल फिवर असेल, तर पॅरासिटामॉल घेतली, तरी ताप कमी होतो. पण अशा औषधांनी तापाचे आतमध्ये रुजलेले जे टॉक्सिन्स आहेत, ते पूर्णपणे निघायला मदत होत नाही. त्यासाठी आयुर्वेदाने लंघन करायला सांगितले आहे. लंघन हा तापामध्ये पहिला उपचार आहे. लंघन म्हणजे फक्त उपाशी रहाणे असे नाही, तर कमी आणि पचायला हलका आहार घेणे. तापाच्या सुरवातीच्या अवस्थेत कमी खाऊन जसे पेज , त्यानंतर औषधे घ्यायला सुरुवात केली, तर त्याचा वेगळा परिणाम होतो. दोषपचन होते
काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आयुर्वेदाने ज्वर किंवा ताप हा अग्निमंद्याशी संबंधित असलेला व्याधी सांगितलेला आहे. ताप आल्यानंतर लगेच खाल्ल्यामुळे तुमचा जठराग्नी मंद होतो. अग्नी आणि जे शरीरातले दोष आहेत, त्यांच्यामध्ये ज्या वेळी असमतोल होतो, त्या वेळी ताप येतो. त्यामुळे उपचार म्हणून प्रथम लंघन केले की, रुग्णाचा अग्नी नॉर्मल व्हायला मदत होते. लंघन केले की, अग्निवर्धन होतो त्यामुळे आम किंवा जे विषारी घटक निर्माण झालेले असतात ते पचून जातात. त्यामुळे आपोआपच ताप कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. एक तर पचनसंस्थेवरचा भार कमी होतो. पचनसंस्थेला विश्रांती मिळते. त्याच्यामुळे आम निर्मिती होत नाही. लंघनाने अॅाक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवते, असे आता संशोधनही झाले आहे. त्यामुळे ताप आलेला असताना विचार न करता रुग्णाला खा- खा म्हणून आग्रह करण्यापेक्षा तुम्ही थोडं लंघन करा, थोडं कमी खा. तुमचा ताप आपोआपच बरा व्हायला मदत होते; कारण तुमची इम्युन पावर त्या वेळी वाढलेली असते.
सोशल मिडियाला डॉक्टर करू नका !
- बऱ्याच जणांचा असा समज असतो की, आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. कोणत्याही मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच्या मनाने आयुर्वेदिक औषधे घेतली जातात. दुष्परिणाम नसले, तरी ते किती मात्रेत घ्यायचे, किती कालावधी घ्यायचे, हे महत्त्वाचे असते ना. रसकल्पामध्ये काही प्रमाणात धातू असतात. अशी औषधेही डॉक्टरांना न विचारता कितीही वेळेपर्यंत घेतली, तर त्याचे साईड इफेक्ट दिसणारच ना…
- काही रुग्ण इंटरनेटवर बघून उपचारांची विचारणा करतात. अशा वेळी त्याला ते आवश्यक आहे कि नाही, हे पहावे लागते. अशा वेळा रुग्णाला काही दुष्परिणामांना सामोरे जावे लागले, तर शास्त्राची बदनामी होते. लोकांनी कुठेतरी इंटरनेटवर पाहून, कुणीतरी सांगितले म्हणून कधीही, कितीही औषधे, काढे घेतले, तर आयुर्वेद कसा काय दोषी ठरतो ?
- आयुर्वेदाच्या औषधांनी लवकर गुण येत नाही, असेही म्हटले जाते. जर त्रिविध परीक्षा, जसे की, दर्शन, स्पर्शन, प्रश्न परीक्षा किंवा देश, काल, ऋतू, प्रकृती, व्याधी, प्रकृती, अग्नी परीक्षा या सगळ्या परीक्षा करून जर तुम्ही आयुर्वेदाची औषधे दिली, तर तुम्ही आयुर्वेदाच्या औषधांनी पण फास्ट रिझल्ट मिळू शकतात.
- मनाने ओव्हर द काउंटर आयुर्वेदाची औषधे घेऊ नये. आयुर्वेदाची औषध म्हणजे डोळे झाकून घ्यायची, असे नाही. आयुर्वेदाची औषधेही योग्य पद्धतीन घेतली नाही, तर दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे ती पण औषध वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजेत.
- आयुर्वेद म्हणजे फक्त औषधे नाहीत, तर लाइफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. त्यात योगासुद्धा आला. आयुर्वेदानुसार, ‘स्वस्थ’ व्यक्तीची व्याख्या आहे: ‘समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थः इत्यभिधीयते ॥
याचा अर्थ आहे, ज्या व्यक्तीचे दोष (वात, पित्त आणि कफ) संतुलित आहेत, धातु (शरीरातील घटक) योग्य प्रकारे कार्य करतात, मलक्रिया (उत्सर्जनाची क्रिया) योग्य आहे, तसेच ज्याचे मन, इंद्रिये आणि आत्मा प्रसन्न आहेत, ती व्यक्ती ‘स्वस्थ’ मानली जाते. त्यामुळे आपण आयुर्वेदाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहिले पाहिजे. (World Health Day)
शब्दांकन : सायली डिंगरे – लुकतुके
हेही पहा –
Join Our WhatsApp Community