मागील सहा महिन्यांपासून दादरसह संपूर्ण मुंबईतील फेरीवाल्यांवर महापालिका तसेच पोलिसांच्या माध्यमातून कारवाई सुरु आहे. त्यामुळे फेरीचा व्यवसाय करणारे त्रस्त असून एका बाजुला पंतप्रधान स्वनिधी योजनेद्वारे फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे, तर दुसरीकडे फेरीवाल्यांना व्यवसायच करण्यास दिला जात नाही. त्यामुळे या फेरीवाला संघटनेने थेट महापालिका प्रशासनालाच पत्र लिहून, ४० वर्षे जुने भारतीय फेरीवाल्यांना फुटपाथवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. जर यापुढेही अशीच कारवाई चालू राहिली तर शेतकऱ्यांप्रमाणे आम्हांलाही आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असाही इशारा संघटनेने दिला आहे.
मुंबईत मागील काही महिन्यांपासून दादरसह संपूर्ण मुंबईत फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र होत चालली असून महापालिकेसोबतच पोलिसही मोठ्याप्रमाणात ही कारवाई करत असल्याने अनेक रस्त्यांवरील फेरीवाल्यांची समस्या दूर होताना दिसत आहे. मात्र, एका बाजुला न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसराच्या आत कारवाई करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात पोलिस दीडशे मीटरच्या बाहेरील फेरीवाल्यांवरही कारवाई करत असल्याने या कारवाईबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक फेरीवाल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा प्रश्न आता फेरीवाल्यांसह जनतेमध्येही निर्माण होऊ लागला आहे.
मात्र, दादरमध्ये सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असल्याने दादर हॉकर्स संघर्ष समितीने जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पत्र पाठवून सर्व फेरीवाल्यांची कैफियत मांडली. या निवेदनात त्यांनी दादर पश्चिम येथील ४० वर्षे जुने भारतीय फेरीवाल्यांना फुटपाथवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. गेले सहा महिने दादर येथील फेरीवाल्यांवर सरकारकडून पोलीस व मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई होत आहे. त्यामुळे दादरमधील फेरीवाले हे खुप त्रस्त आहेत. सर्व जण कर्जबाजारी झाले आहेत, अशी व्यथा मांडली आहे.
दादरमधील १००० फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेद्वारे दिलेले १०,००० रुपयांचे कर्ज घेतलेले आहेत. परंतु प्रशासन व्यवसाय करु देत नाही. म्हणून फेरीवाले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहेत. दादर फेरीवाला संघर्ष समितीचे दादरमधील ६०० फेरीवाले सभासद आहेत, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय खांडे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – Jasprit Bumrah : आशिया कपमध्ये बुमराह करणार कमबॅक?)
सन २०१६ मध्ये महापालिकेने दादर मधील फेरीवाल्यांवर कडक कारवाई चालू केली होती. तेव्हा येथील ५२ फेरीवाले उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस उच्च न्यायालयानेही फेरीवाल्यांचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, जे महापालिकेच्या २०१४च्या सर्व्हेमध्ये पात्र आहेत, असे सांगितले होते व आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती. आज या सततच्या कारवाईमुळे दादरमधील फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ह्या वर्षी कोणत्याच फेरीवाल्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविले नाही, कारण शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा? इथे दोन वेळच्या जेवणाचे पैसे आम्ही कमवत नाही. जर अशीच कारवाई चालू राहिली तर साहेब शेतकऱ्यांप्रमाणे आम्हांसही आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही,असेही खांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community