एप्रिल महिन्याच्या आगमनानंतर आता फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याने देखील बाजारात एंट्री मारली आहे. पण अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे हापूसचे नुकसान झाले आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे हापूस निर्यातीला येणारा खर्च वाढला आहे. यामुळे आंब्याच्या निर्यातीत यंदा 50 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे.
निर्यातीवर भर नाही
यंदा आंब्याला दोन-तीन टप्प्यांत मोहोर आला आहे. थंडी, धुके आणि आवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पहिल्या टप्प्यातील आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता दुस-या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. आंब्याची निर्यात जरी आता सुरू झाली असली तरी त्याला फारसा वेग आलेला नाही. स्थानिक बाजारपेठेत आंब्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आणि व्यापारीसुद्धा निर्यातीवर भर देत नसल्याचं समजत आहे.
(हेही वाचाः या 19 जिल्ह्यांत ‘झिरो’ बूस्टर डोस)
इतकी होते निर्यात
देशातून हापूससोबतच आंब्याच्या विविध जातींची 50 हजार टनपर्यंत निर्यात करण्यात येते. यामध्ये केसर आंब्याचा वाटा सर्वात जास्त म्हणजे 50 टक्के इतका असून, हापूस आंब्याचा वाटा केवळ 10 ते 11 टक्के इतका असतो. दरवर्षी 7 ते 8 हजार टन हापूसची निर्यात करण्यात येते. त्यापैकी हजार ते बाराशे टन आंब्याची अमेरिका वारी होते.
(हेही वाचाः दोन वर्षांनंतर मंत्रालयाचा ६ वा मजला गजबजला!)
तसेच युरोप, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया या देशांमध्ये हवाई मार्गाने हापूस निर्यात केला जातो. हापूसच्या अमेरिका वारीवर अनेक मर्यादा असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कोकण विभाग उप सरव्यवस्थापक भास्कर पाटील यांनी सांगितले. पण इंधन दरवाढ आणि अवकाळी पावसाचा फटका यामुळे यावर्षी निर्यातीत घट होण्याचे देखील सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community