सुशांत सावंत
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, मागील २४ तासांमध्ये राज्यामध्ये २३,३६५ रुग्णांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना कोरोनाचे तांडव सुरुच असल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये पहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्यामध्ये कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांचा आकडा देखील वाढत असून, मागील चौवीस तासांमध्ये राज्यात ४७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईचा डबलिंग रेट ५८ दिवसांवर
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसात डबलिंग रेट ८४ वरुन ५८ दिवसांवर आला आहे. एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्येत वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरु लागला आहे. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वेगाने दुप्पट होऊ लागले आहेत. तर रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी ८० ते १०० दिवसांवर स्थिरावला होता. ३१ ऑगस्टला तो ८४ दिवस इतका होता. मात्र अवघ्या दहा दिवसात तो घसरुन तब्बल ५८ दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी ६७ दिवस होता. गेल्या महिन्याभरात मुंबईत रोज १००० ते १२०० च्या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र आता २००० हून अधिक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले आहे.
राज्यातील रुग्णवाढीची प्रमुख कारणे
मुंबईसारख्या शहरात आता लोक कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत, अनलॉक सुरू झाल्याने मोठया प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठा मंडई मार्केट सुरू केल्याने लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणेश उत्सवाचा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करा असे सांगण्यात आलं होतं. पण अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळाली. सुरुवातीला कोरोनाबाबत असणारी भीती आता कमी झाली आहे. त्यामुळे लोकं बिनधास्त बाहेर विनामास्क सुद्धा फिरत आहेत.
देशातही कोरोनाचा विस्फोट
कोरोना रुग्णांचा वाढता आलेख हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ९७ हजार ८९४ लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा ५० लाख पार झाला असून ५१ लाख १८ हजार २५४ रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे २४ तासांत १ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ८३ हजार १९८ वर पोहोचला आहे.
कोरोना लसीकडे सर्वांचे लक्ष
एकीकडे राज्यातील आणि देशातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेली कोरोनावरील लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. तरीही या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस तयार करु असा विश्वास ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्रॅजेनेका या संस्थेने व्यक्त केला आहे. अॅस्ट्रॅजेनेकाचे मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. तसेच लस तयार करताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे कोरोनावरील लस डिसेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात असणारी लस थांबविण्यात आली आहे. काहींना ही लस दिल्यानंतर त्रास झाला. म्हणून भारतातही लस देणे थांबविण्यात आले आहे त्यामुळे जोवर ही लस येत नाही तोवर कोरोनाचे संकट आवासून उभे राहणार आहे.