‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

छोट्या उद्योगधंद्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज पुरस्कार’ यांचे १७ डिसेंबर रोजी वितरण होणार आहे. प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून समजल्या जाणा-या या पुरस्कारासाठी ११ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या संकेतस्थळावर इच्छुकांना अर्ज कारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून अर्ज करता येऊ शकणार आहे. ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज पुरस्कार’ हे पुरस्कार यावर्षीपासून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रतिष्ठानने मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

विजेत्यांची निवड करण्यासाठी समिती 

उद्योजक, कलावंत, शेफ्स आणि छोट्या व्यावसायिकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठापनाची २५ वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या पुरस्कार सोहळ्यात पुरुष आणि स्त्रिया दोन्ही सहभागी होऊ शकतात. यासाठी ऑनलाईन आणि फोनच्या माध्यमातून मुलाखती घेणे आम्ही सुरु केले आहे, अशी माहिती ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या ट्रस्टी मधुरा मोहाडीकर यांनी दिली. मुलाखतीतून निवडलेल्या १०० उमेदवारांना पुरस्काराआधी व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल. विजेत्यांची निवड करण्यासाठीच्या समितीत प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते भरत दाभोलकर, अभिनेत्री सविता प्रभुणे, ‘आसियान’चे व्यवस्थापकीय संचालक अमित वायकर आणि प्रख्यात फूड मायक्रोबायोलोजिस्ट डॉ. दीपा भाजेकर यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केली. यावेळी ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ त्रैमासिकाच्या मुख्य संपादिका शैला गोखले, ट्रस्टी सायली धमधेरे, वैशाली वझे तसेच प्रायोजक एसबीआय बँकेच्यावतीने भरत अडसूळ उपस्थित होते.

(हेही वाचा एकविरा आईच्या दारी, हलाल मांसाची विक्री)

८ मार्च १९९७ रोजी स्थापन झालेले आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान म्हणजे मीनल मोहाडीकर यांच्या द्रष्टेपणाचे फलीत म्हणून स्थापन झालेला ट्रस्ट आहे. स्त्री उद्योजकतेचा पुरस्कार करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. व्यासपीठ वाढत असताना त्यांनी समावेशकतेचा पर्याय निवडला आहे आणि उद्योजकतेचा पुरस्कार करण्याचे धोरण कायम राहणार आहे. ट्रस्टने पहिलेवहिले आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्स्चेंज घेण्याचा निर्णय केला आहे. हे प्रतिभावान कलावंत, उद्योजक, स्टार्टअप्सचे संस्थापक व व्यावसायिकांना मान्यता देणारे सर्वसमावेशक व्यासपीठ असेल. उद्योजक, कलावंत, शेफ्स आणि छोट्या व्यावसायिकांना नियमितपणे आपली प्रतिभा दाखवत राहण्यासाठी व्यासपीठांची गरज भासते. त्यांच्या व्यवसायांच्या व ब्रॅण्ड्सच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारी मान्यता ही काळाची गरज आहे. त्यांचा यूएसपी किंवा चाकोरीबाह्य नवोन्मेष प्रकाशात आणण्यासाठी असो, लक्ष्यगटाला आकर्षित करण्यासाठी असो किंवा सर्जनशील उत्कृष्टता पुरवण्यासाठी असो, महत्त्वाकांक्षांना योग्य मार्ग शोधून देण्यात मान्यता नेहमीच उपयुक्त ठरते.

आम्ही उद्योगिनी ट्रस्ट विषयी

१९९७ साली महिला दिनी स्थापन झालेल्‍या आम्ही उद्योगिनीचे रूपांतर एका छोट्या उपक्रमापासून आज एका मोठ्या संस्थेत झाले आहे. संस्थेने स्त्री सबलीकरणाचा एक उपक्रम म्हणून आपली सुरुवात केली आणि स्त्रियांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले पण लवकरच काळासोबत बदलण्याचा व समावेशक होण्याचा निर्णय संस्थेने घेतला. संस्थापक सदस्या  मीनल मोहाडीकर यांचे द्रष्टे नेतृत्व संस्थेला लाभले आहे. व्ही.व्ही. देशपांडे, रजनी दांडेकर, प्रदीप वर्मा, पुष्पा त्रिलोकेकर आदी प्रख्यात उद्योजक व्यावसायिकांचा पाठिंबा व मार्गदर्शन संस्थेला लाभले आहे. संस्थेचे मुख्यालय मुंबईत दादर (पश्चिम) येथे आहे, तर नवी मुंबई, कल्याण, बोरिवली, ठाणे, गोरेगाव, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद व दुबई येथे संस्थेच्या शाखा आहेत. आगामी एयूपीबीएक्स पुरस्कार ट्रस्टतर्फे प्रथमच आयोजित केले जात आहेत आणि भारतभरातील उद्योजकांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here