आजीच्या घरी राहणाऱ्या एका ११ वर्षीय बालिकेवर परिचित २३ वर्षीय नराधमाने टीव्ही पाहण्यासाठी घरात बोलावून बलात्कार केला होता. ही घटना साडेतीन वर्षांपूर्वी तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यामुळे येथील विशेष अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. काळे यांच्या न्यायालयाने नराधमाला १० वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने शनिवारी, ५ मार्च रोजी दिला आहे. दु:खाची बाब म्हणजे घटनेनंतर अवघ्या १६ महिन्यांतच पीडितेचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
अक्षय चव्हाण (२३) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित बालिका ही तिच्या आजीकडेच राहत होती. दरम्यान, एक दिवस अक्षयने पीडित बालिकेला टीव्ही पाहण्यासाठी बोलावले. ही बालिका टीव्ही पाहण्यासाठी गेली असता या नराधमाने बालिकेवर जबरीने बलात्कार केला. हा घटनाक्रम बालिकेने आजीला सांगितल्यानंतर तिवसा पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय चव्हाण विरुद्ध बलात्कार तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील शशिकिरण पलोड यांनी सात साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. यावेळी एकही साक्षीदार फितूर झाला नाही. यावेळी नराधम अक्षय चव्हाण विरुद्ध दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला दहा वर्षे सश्रम कारावास तसेच ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
(हेही वाचा पंतप्रधान मोदींचे स्वागत, मुख्यमंत्री मात्र गैरहजर! कारण काय?)
निर्णय येण्यापूर्वीच पीडितेने साेडले जग
२०१८ मध्ये ११ वर्षीय पीडितेवर बलात्कार झाला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच डिसेंबर २०१९ मध्ये पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण मात्र पुढे आले नसल्याचे विशेष सरकारी वकील शशिकिरण पलोड यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community