अमरावती आदिवासी आश्रम शाळेत 32 विद्यार्थीनींना विषबाधा

104

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा जवळील बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील 32 विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी, 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली. या सर्व विद्यार्थीनींना अचलपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यार्थीनींना अचानक पोटात दुखायला लागले

परतवाडा बहिरम- बैतूल मार्गावरील पंचशील आदिवासी आश्रम शाळा येथे विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थीनींना अचानक पोटात दुखायला लागले. चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, ताप ही लक्षणे विद्यार्थ्यांना दिसू लागली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. त्यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.

(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)

आठ मुलींची प्रकृती सुधारणाजनक

या विषबाधा घटनेमध्ये मुलींची संख्या एकूण 32 असून आठ मुलींची प्रकृती सुधारणाजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांना आता डिस्चार्ज देण्यात आला असून इतर 28 मुलींवर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचार सुरू आहेत. ही विषबाधा पिण्याच्या पाण्यातून किंवा अन्नातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विषबाधा नेमकी कशातून झाली हे चौकशी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.