एकीकडे इंधन, घरगुती गॅसच्या भावामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यात आता देशातील प्रसिद्ध अमूल ब्रँडने दुधाच्या किंमतीत दोन रुपये प्रति लिटरने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, १ मार्चपासून ही दरवाढ लागू होणार आहे. नव्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार हे निश्चित आहे. कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाल्याने अमूलने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
( हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा प्रवास होणार अधिक सुखकर! )
अमूल दूधाच्या किमतीत वाढ
अमूलने लागू केलेल्या नव्या दरानुसार, अहमदाबाद आणि सौराष्ट्राच्या बाजारात १ मार्चपासून अमूल गोल्ड दूधाची किंमत ३० रुपये अर्धा लीटर, अमूल ताजा दूधाची किंमत ४८ रुपये अर्धा लीटर आणि अमूल शक्ती २७ रुपये अर्धा लीटर दराने विक्री केली जाणार आहे. गुजरात सहकारी दूध विपणन संघाने जुलै २०२१ मध्ये दर वाढवले होते. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत दुसऱ्यांदा दुधाचे भाव वाढवले आहेत. ही दरवाढ अमूल सोना, अमूल ताजा, अमूल शक्ती, अमूल टी-स्पेशल तसेच गाय-म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल.
दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ
ऊर्जा, पॅकेजिंग, वाहतूक, पशुखाद्य यावरील खर्चात वाढ झाल्याने दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे उत्पादनाचा एकूण खर्च वाढला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही वाढ लक्षात घेऊन अमूलने दुधाच्या दरात प्रति किलो फॅट ३५-४० रुपयांनी वाढ केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी अधिक आहे, असे अमूलने म्हटले आहे. यामुळे आता दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होणार आहे.
Join Our WhatsApp Community