मध्य प्रदेश एसटी अपघात: मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून 10 लाखांची मदत! मुख्यमंत्र्यांचे निर्देश

इंदौरहून जळगाव येथे येणा-या एसटीच्या बसचा सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. नर्मदा नदीवरील पुलावरुन ही बस नदीत कोसळून या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत राज्यासह संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आता एसटी महामंडळाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

अपघात झालेली ही बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे इंदौरहून येत होती. सोमवारी सकाळी ही बस नर्मदा नदीवरील पुलावरुन जात असताना नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातामागचे नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही.

(हेही वाचाः MP MSRTC Bus Accident: एसटी बस नर्मदेत कोसळली, महामंडळाकडून हेल्पलाईन नंबर जारी)

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

या अपघाताची गंभीर दखल राज्य सरकारडून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

बहुतांश प्रवासी महाराष्ट्रातील

या अपघातातील बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 15 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. तर यामध्ये 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान मृतांची ओळख पटवण्यात येत असून, आतापर्यंत 8 जणांची ओळख पटल्याचे समजत आहे. या 8 जणांपैकी 5 जण हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे. तसेच बसमधील बहुतांश प्रवासी हे महाराष्ट्रातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचाः गोदावरी, प्राणहिता पाणलोट क्षेत्रात नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here