रात्री पवई तलावात चोरी छुपे कसले बांधकाम सुरु आहे?

92

पवई तलावातील सायकल ट्रेक उभारणीवरुन वाद सुरु असताना, गेल्या तीन दिवसांपासून तलावाजवळ रात्री दहानंतर चोरीछुप्या पद्धतीने बांधकाम सुरु असल्याचे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या पाहणीतून आढळले. आयआयटी नजीकच्या भागांत रात्री बांधकाम सुरु असताना, या भागांत मगरींच्या अंड्यांना तसेच कासवांनाही धोका पोहोचत असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

रात्रीच्या वेळी बांधकाम

सायकल ट्रेकच्या उभारणीसाठी आवश्यक परवानगी नसताना, हा प्रकल्प उभारला जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत बळी यांनी केला. पवई तलावांत मगरींचा अधिवास आहे. कासवांचीही येथे मुबलक प्रमाणात संख्या आढळून येते. वन्यजीवांच्या रक्षणासाठी निदान वनविभागाकडून अपेक्षित हालचाली होणे गरजेचे असल्याचे बळी म्हणाले. या प्रकल्पाबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना दिली गेली नाही, अशातच रात्रीच्या बांधकामाविषयीही स्थानिकांनी जाब विचारताच पालिकेच्या जलविभागाशी संबंधित बांधकाम सुरु असल्याच्या थापा दिल्या जात असल्याचे पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: वाझेची फाइलही मंत्रालयातच चाळली! किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट )

पर्यावरण मंत्र्यांनी बैठक घ्यावी

प्रस्तावित सायकल ट्रेकच्या उभारणीबाबत स्थानिकांचा रोष पत्करुन प्रकल्प का लादला जात आहे, असा सवालही पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत बळी यांनी केला. या प्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिकांसह, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांसह बैठक घ्यावी, अशी मागणीही बळी यांनी केली. मंत्र्यांनी निदान ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.