Energy : राज्यातील ऊर्जा निर्मितीमध्ये १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

119

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य सरकार  आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील मंगळवारी समंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार  टाटा पॉवर कंपनी  रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे  १ हजार मेगावॅट तर  पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शिरवटा येथे १ हजार ८०० मेगावॅट या दोन ठिकाणी एकूण २८०० मेगावॅट क्षमतेचे  उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात सुमारे  १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ६ हजार इतकी प्रत्यक्ष आणि  अप्रत्यक्ष रोजगार निर्म‍िती होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा, विनय नामजोशी, प्रभाकर काळे, अभिजीत पाटील उपस्थित होते.

(हेही वाचा Veer Savarkar : आद्य हिंदी राष्ट्रध्वज इंग्लंडमध्ये फडकावलेल्या घटनेला झाली ११५ वर्षे; सावरकर स्मारकात जागवल्या स्मृती)

भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत. २ हजार ८०० मेगावॅटच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मागील काळात उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र सरकारने  अतिशय आक्रमकपणे भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले आहेत . महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त जागा असलेले राज्य आहे. अशा सर्व उपयुक्त जागांचा उपयोग करण्याचा प्रयत्न सरकार  करीत आहे. त्यासाठी राज्य सरकारने  चांगले धोरण तयार केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

टाटा पॉवरने हा सामंजस्य करार कृतीत  आणून वेगाने काम सुरू करावे. यासाठी वैधानिक मान्यता आणि  सर्व मदत करण्यास राज्य सरकार  तयार आहे. टाटा पावर महाराष्ट्रात काम करतेच आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे काम सुद्धा टाटा पॉवर कंपनी त्यांच्या नावाला साजेसे करतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. उदंचन जलविद्युत प्रकल्प नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेज प्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे खालच्या जलाशयातून वरच्या भागातील जलाशयात  पंपींग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर जलविद्युत निर्म‍ितीसाठी केला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.