अंधेरी -जोगेश्वरीत तुंबणाऱ्या पाण्याचे निवारण:मोगरा नाल्याला जोडणाऱ्या गटारांची वाढवली जाते क्षमता

170

अंधेरी सब वेसह दाऊबाग, आझाद नगर, वि.रा देसाई आदी भागांमध्ये  पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीला कारणीभूत असलेल्या मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशन उभारणीच्या कामांना तांत्रिक बाबींमुळे खिळ बसलेली असतानाच आता या नाल्याला जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता अधिक वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन भागांमध्ये विभागून पावसाळी पाणी वाहून नेण्याच्या वाहिन्यांची क्षमता अधिक वाढवण्याच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या तिन्ही कामांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून यावर एकूण १०५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

अंधेरी सब वे मार्गे मोगरा नाल्यामधून वाहणारे पाणी मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मालाड खाडीत वाहून जाते. मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्याने मोठया प्रमाणात पाऊस पडल्यास आणि त्यावेळेस नाल्यातील पाण्याची पातळी वाढून अंधेरी पश्चिम भागातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे तीन भागांमध्ये विभागून पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची क्षमता अधिक वाढवण्याची कामे हाती घेतली जात आहेत.

विरा देसाई रोड कल्व्हर्टपासून ते कोर्ट यार्ड जंक्शनमार्गे दत्ताजी साळवी रस्ता ते आरटीओ जंक्शन ते लिंक रोड मार्गे सिटी मॉल येथे मोगरा नाल्यापर्यंत पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी पेटीका नाल्यांचे काम केले जाणार आहे. तर एस .व्ही .रोड कल्व्हर्टपासून ते वि.रा.देसाई रोडपर्यंत खोलीकरण व रुंदीकरण केले जाणार आहे. याशिवाय भरडावाडी रोड कल्व्हर्टपासून ते जे.पी रोड लगत डि. एन. नगर मेट्रो स्थानकाजवळील क्रिस्टल मॉल येथील मोगरा नाला कल्व्हर्टपर्यंत नवीन पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी वाहिनी बसवणे आदी प्रकारची तीन कामे विविध ठिकाणी हाती घेतली जात आहेत.

विशेष म्हणजे सन २०१७ मध्ये येथील मोगरा नाल्याच्या पेटीका नाल्याच्या आसीसी पेटीका वाहिन्यांचे काम करण्यात आले होते. यावर  ३२ कोटी रुपये खर्च झाले होते. हे काम देव इंजिनिअरींग या कंपनीच्या माध्यमातून महापालिकेने करून घेतले होते. त्यानंतर आता पाच वर्षांनी अन्य पेटीका नाल्यांसह तीन भागांमध्ये विभागून ही कामे केली जात आहेत.

मोगरा नाला पंपिंग स्टेशनच्या काम रखडले

 मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी सन २०२१ मध्ये स्थायी समितीच्या मंजुरीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामांसाठी मिशिगन इंजिनिअर्स व म्हाळसा कंस्ट्रक्शन या कंपनीला संयुक्त भागीदारीत काम देण्यात आले आहे. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनल्याने याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. कंत्राटदाराला हे काम २० महिन्यांमध्ये पूर्ण करायचे होते. हे पंपिंग स्टेशन बनल्यास अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसर,मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरात  होणारी पूरपरिस्थिती कमी होणार आहे. या पंपिंग स्टेशनचे काम मागील १४ वर्षांपासून अडले असून ही जमिन खासगी असल्याने याच्या जमिनीचेही महापालिकेने पैसे भरलेले आहे. हे पंपिंग स्टेशन पूर्णपणे आता नाल्यातच उभारण्याचा निर्णय घेतला तरीही तांत्रिक बाबींमुळे हे काम अद्यापही रखडलेले असल्याचेच बोलले जात आहे.

हिंदमातातून महापालिकेने शिकला धडा

हिंदमाता परिसरात तुंबणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांची कायमची मुक्तता करण्यासाठी महापालिकेने ब्रिटानिया आऊटफॉल येथे पंपिंग स्टेशन बांधले. परंतु हे पंपिग स्टेशन बांधले तरी याठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या सक्षम नव्हत्या. त्यामुळे परेलपासून भायखळापर्यंत पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या टाकून या पाणी वहनाची क्षमता मजबूत केली. त्यामुळे मोगरा नाल्याच्याठिकाणी पंपिंग स्टेशनचे बांधकाम करताना येथील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची क्षमताही मजबूत करण्यासाठी तीन भागांमध्ये हे काम करण्यात येत असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

( हेही वाचा: मुंबईतील वस्त्यांमधील तिशीपार व्यक्तीची होणार आरोग्य चाचणी तर एम-पूर्व विभाग पुन्हा या आजारांसाठी चर्चेत )

 या भागांमध्ये व्हायची पुरपरिस्थिती

  • अंधेरी सब वे, दाऊद बाग, ढाकूशेठ पाडा, भरडावाडी, आझाद नगर, विरा देसाई रोड,

तीन भागांमध्ये होणाऱ्या कामांसाठी होणारा खर्च आणि कंत्राटदार

मोगरा नाला विरा देसाई रोड कल्व्हर्ट ते कोर्ट यार्ड जंक्शन मार्गे आणि सिटी मॉल येथील मोगरा नाल्यापर्यंत, एकूण खर्च : ३६.८३ कोटी रुपये

  • कंत्राट कंपनीचे काम : भव्या एंटरप्रायझेस

भरडावाडी रोड कल्व्हर्ट पासून क्रिस्टल मॉल पर्यंतची पेटीका नाल्यांचे बांधकाम

  • एकूण खर्च : ३४. ६४ कोटी रुपये
  • कंत्राट कंपनीचे नाव : बुकॉन इंजिनिअर्स एँड एंटरप्रायझेस

मोगरा नाल्याचे एस व्ही रोड कल्व्हर्टपासून विरा देसाई रोडपर्यंत नाल्यांचे ट्रेनिंग व रुंदीकरण

  • एकूण खर्च : ३४.०६ कोटी रुपये
  • कंत्राट कंपनीचे नाव : मानसी कंस्ट्रक्शन
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.