हिंदूंच्या श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने राज्यात ३ हजार मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक गावात मंदिर असावे, या ध्येयाने काम करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राज्यात यापूर्वी १३३० मंदिरे बांधली जाणार होती. आता त्यात आणखी १४६५ मंदिरांची भर पडणार आहे, असे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले.
९७८ मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू
मंगळवारी, २८ फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले की, सरकारने मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने गरीब वर्गातील लोकांच्या भागात मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात यापूर्वी १,३३० मंदिरे बांधली जाणार होती. त्यात आता १,४६५ मंदिरांची भर पडली आहे. एवढेच नाही तर आमदारांच्या विनंतीवरून आणखी २०० मंदिरेही जोडली जाणार आहेत. या हिंदू मंदिरांच्या बांधकामासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानचा श्री वाणी ट्रस्ट प्रत्येक मंदिराला १० लाख रुपये देईल, असेही सत्यनारायण यांनी म्हटले आहे. बांधकाम विभागाकडून उभारण्यात येत असलेल्या ९७८ मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर २५ मंदिरांच्या बांधकामाचे काम सहाय्यक अभियंत्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय अन्य काही सहाय्यक अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर इतर काही मंदिरे स्वयंसेवी संस्थांद्वारे बांधली जात आहेत.
(हेही वाचा रामदास आठवलेंच्या रिपाईचा नागालँडमध्ये डंका)
धार्मिक विधींसाठी मंदिरांना २७० कोटींची तरतूद
काही मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि मंदिरांमधील धार्मिक विधींसाठी तरतूद केलेल्या २७० कोटींपैकी २३८ कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षात ५,००० रुपये प्रति मंदिर दराने धार्मिक विधींसाठी (धूप दीप नैवेद्यम) राखून ठेवलेल्या २८ कोटींपैकी १५ कोटी रुपये मंदिरांना देण्यात आले आहेत. सन २०१९ पर्यंत धूप, दीप, नैवेद्य योजनेअंतर्गत केवळ १,५६१ मंदिरांची नोंदणी झाली होती. तर आता ही संख्या ५ हजारावर पोहोचली आहे. आंध्र प्रदेशात एकूण २६ जिल्हे आहेत. सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक गावात मंदिर बांधण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या १० लाख रुपयांपैकी ८ लाख रुपये मंदिराच्या बांधकामासाठी खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित २ लाखांची रक्कम मूर्ती तयार करण्यासाठी किंवा खरेदीसाठी वापरली जाणार आहे.