शासनाने दिलेल्या फोनला वैतागल्या अंगणवाडी सेविका

190

पोषण अभियानांतर्गत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल फोन परत करण्याचे आंदोलन १७ ऑगस्टपासून पुकारले असून, राज्यातून लाखभर फोन परत केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम.ए.पाटील यांनी दिली आहे.

मोबाईल होतो हँग

राज्यात १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना पोषण अभियानांतर्गत २०१९ मध्ये मोबाईल फोन दिले होते. स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांचे वजन, उंची याची माहिती त्यात भरायची होती. मात्र मोबाईलची रॅम मेमरी कमी पडत असल्याने केंद्राने नवीन आणलेले पोषण ट्रॅकर अॅप यात डाऊनलोड होत नाही. तसेच हे अॅप इंग्रजीत आहे, त्यातील माहिती डिलीट करता येत नाही. फोनच्या चार्जींंगमध्ये अडचणी असून, मोबाईल सारखा सारखा हँगसुद्धा होतो. त्यामुळे अंगणवाडी सेविका वैयक्तिक मोबाईलमध्ये ट्रॅकर डाऊनलोड करुन इतरांच्या मदतीने त्यात माहिती भरत आहेत.

 

(हेही वाचाः राज्य शासनाकडूनच लसी कमी मिळतात… मुंबई महापालिकेने दिली माहिती)

राज्य सरकारने झटकले हात

या मोबाईल संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र राज्याकडे निधी नाही, फोन बदलण्यासाठी केंद्राकडून निधी घ्यावा लागेल, तसेच पोषण ट्रॅकर केंद्र सरकारचे आहे, असे सांगून त्यांनी हात झटकले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आता मोबाईल वापसी चळवळ सुरु केली आहे. पुढच्या आठवड्यात सुमारे एक लाखभर माेबाईल प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करण्यात येतील, अशी माहिती कृती समितीच्या शुभा शमीम यांनी दिली.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अंगणवाडी वर्कर असोसिएशनने मोबाईल संदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु केंद्राने दखल न घेतल्याने मोबाईल वापसीचे देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

(हेही वाचाः दोन महिने उलटूनही केवळ ९ ऑक्सिजन प्लांटची उभारणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.