‘वीर सावरकरां’चा विसर; नाशिककर आक्रमक

79

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये नाशिकचे भूमिपुत्र आणि मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेच्या तेजाने तळपणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच नाशिकच्या भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुह, भगूरवासियांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी समस्त भगूर नागरिक आक्रमक झाले आहेत.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकास यजमान पद मिळालेले असून आपल्या या भुमीत मायबोली मराठीचे साहित्य संमेलन भरणार आहे. हे संमेलन नाशिक येथे होण्यास आद्य साहित्यिक, कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या सर्वांचे एक वलय आहे. मात्र त्यापैकीच एक असणारे नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, इतिहासकार, उत्कृष्ट वक्ते असे बहुआयामी हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याबरोबरच अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, इतर पुस्तकांचे अनुवाद, इतिहास लेखन, भाषाशुद्धी सर्व क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या कार्यामुळेच १९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांना देण्यात आले होते. मात्र यंदाच्या साहित्य संमेलनात त्यांच्या नावाचा विसर पडल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा- नाशिकच्या साहित्य संमेलनगीतात भूमिपुत्र असलेल्या सावरकरांचाच उल्लेख नाही!)

विशेष म्हणजे यंदा एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिक नगरीत मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये खालील उपक्रम राबवून आद्य साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा देखील जागर व्हावा व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा अशी समूहाच्या वतीने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी स्वरूपात यापूर्वी विनंती करण्यात आली असल्याचे भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाकडून सांगण्यात आले आहे.

अशा केल्या मागण्या

1. साहित्य संमेलनाच्या ठिकाणास स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्यात यावे. अथवा प्रवेशद्वारास किंवा व्यासपीठास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे.

2. साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भव्यप्रतिमा अथवा मूर्ती ठेवण्यात यावी.

3. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव साहित्य संमेलनात मांडण्यात यावा.

4. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यावर आधारित विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे.

5. सावरकरांचे साहित्य जनमानसात पोहोचावे यासाठी विशेष स्टॉलची उभारणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात यावी.

6. सावरकरांची जन्मभूमी भगूर तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली नाशिक व भगूरमधील काही ठिकाणे तसेच त्यांची ग्रंथसंपदा व मराठी साहित्यातील त्यांचे योगदान याबाबतची एक ध्वनिचित्रफीत संमेलनात दाखविण्यात यावी.

नाशिक येथील संमेलनात वरील सर्व उपक्रम राबवून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान व्हावा व जनसामान्यांपर्यंत त्यांच्या साहित्यिक कार्याची देखील माहिती व्हावी अशी आम्ही विनंती केलेली होती.

जाणीवपूर्वक वीर सावरकरांचा उल्लेख नाही?

परंतु भगूरकरांचे व नाशिककरांचे हे दुर्देव म्हणावे लागेल. नाशिक या नगरीत साहित्य संमेलन पार पडत असतानाही वरील मागण्याचा तसूभरही विचार केला गेला नाहीच. याउलट नुकतेच साहित्य संमेलनावर आधारित एक गीत तयार करण्यात आले ते बघता त्यामध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख स्पष्टपणे करण्यास जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले दिसून येते. बाकी सर्व साहित्यिक व कलावंतांचा अगदी स्पष्टपणे व बिनदिक्कतपणे उल्लेख केलेला दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर पक्षपाती, संकुचित व दुराग्रही वृत्तीचा व संयोजकांचा नाशिकर, भगूरवासिय आणि सर्व सावरकर प्रेमींंकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.