इटलीहून येणा-या विमानातून याआधी १२५ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच इटलीहून आणखी एक विमान आले असून त्यामध्ये तब्बल १५० प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीतून पंजाबमधील अमृतसर येथे दाखल झालेल्या विमानात हा कोरोनाचा बॉम्ब फुटला आहे.
बाधित रुग्णांसह सर्वच प्रवासी क्वारंटाइन
विमानातून आलेल्या एकूण प्रवाशांपैकी १५० प्रवासी कोरोनाबाधित आढळले असून विमानातील सर्वच प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. इटलीतील मिलान येथून शुक्रवारी, ७ जानेवारी रोजी अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान दाखल झाले. या विमानात एकूण २९० प्रवासी होते. या प्रवाशांची चाचणी करण्यात आली असता त्यातील १५० प्रवासी कोरोनाबाधित आढळल्याचे सांगण्यात आले. बाधित रुग्णांसह सर्वच प्रवाशांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले असून पुढील पावले उचलण्यात येत आहेत, असेही सांगण्यात आले. लागोपाठ दोन दिवस इटलीतून आलेल्या विमानात कोरोनाचा स्फोट झाल्याने अमृतसर विमानतळावर मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारीही इटलीतून आलेल्या विमानात १७० पैकी १२५ प्रवासी कोरोनाबाधित आढळले होते.
(हेही वाचा पंतप्रधानांना देण्यात येणारी एसपीजी सुरक्षा आहे तरी काय?)
महाराष्ट्रातील स्थिती गंभीर
दरम्यान, देशात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देश कोरोनाची तिसरी लाट झेलत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल १ लाख १७ हजार ९४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय विचार केल्यास महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रात २४ तासांत ३६ हजार २६५ नवे रुग्ण आढळले, तर पश्चिम बंगालमध्ये १५ हजार ४२१, दिल्लीत १५ हजार ९७, तामिळनाडूत ६ हजार ९८३ आणि केरळमध्ये ४ हजार ६४९ रुग्ण आढळले. त्याचवेळी ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही आता तीन हजारचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. ओमायक्रॉनचे देशात सध्या ३ हजार १० रुग्ण असून त्यात सर्वाधिक ८७६ रुग्ण महाराष्ट्रात तर त्यानंतर ४६५ रुग्ण दिल्लीत आहेत. एकूण रुग्णांपैकी १ हजार १९६ रुग्ण बरे झाले आहेत.
Join Our WhatsApp Community