प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात ‘एनआयए’ या तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत राज्याच्या गृहविभागाकडे परवानगी मागितली असल्याचे समजते.
वाझेकडे इतकी संपत्ती आली कुठून?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सचिन वाझे याला अटक केली आहे. वाझेला सध्या न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. वाझेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या महागाड्या मोटारीची चर्चा रंगली होती. पोलिस विभागात सहाय्यक पोलिस निरीक्षक असणारा सचिन वाझे याच्याकडे एवढी संपत्ती, महागड्या मोटारी कुठून आल्या याबाबत संशय निर्माण झाला आहे. सचिन वाझे याने कमविलेल्या या संपत्तीबाबत चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढे आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाझेच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी गृहविभागाकडे पत्र पाठवून चौकशीसाठी परवानगी मागितली असल्याचे समजते. मात्र याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
(हेही वाचा : आयपीएस अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांची का वाटते भीती? वाचा… )
असा अडकला वाझे!
- २५ फेब्रुवारी- मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार
- ५ मार्च- स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला
- ७ मार्च- एटीएसकडे दोन्ही गुन्हे वर्ग करण्यात आले
- ९ मार्च- मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास एनआयएकडे
- १३ मार्च- रात्री सचिन वाझे याला अटक
- १४ मार्च- वाझेला एनआयए विशेष न्यायालायाने सुनावली २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी
- २५ मार्च- पुन्हा एनआयए कोठडीत वाढ. ३ एप्रिल पर्यंत एनआयए कोठडी
- ३ एप्रिल- युएपीजे कायदा कलमात वाढ केल्यानंतर पुन्हा ७ एप्रिल पर्यंत कोठडीत वाढ
- ७ एप्रिल- दोन दिवसांनी कोठडीत वाढ
- ९ एप्रिल- १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी