कोविड रुग्णांवर अँटीबॉडीज कॉकटेलचा प्रयोग यशस्वी! काय आहे हा नवा प्रयोग?

या नवीन औषधोपचार पद्धतीमुळे मुंबईकर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर अंटीबॉडीज कॉकटेलचा प्रयोग यशस्‍वी होत असल्‍याचा प्राथमिक निष्‍कर्ष हाती आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या औषधांचा वापर करता यावा यासाठी पुरेशी तयारी केली आहे. कोविडचा सामना करण्‍यासाठी आरोग्‍य सेवा-सुविधा सुसज्‍ज असताना, तसेच लसीकरणाला वेग दिल्‍यानंतर या नवीन औषधोपचार पद्धतीमुळे मुंबईकर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

तिसरी लाट तातडीने रोखण्यासाठी प्रयत्न

कोविड-१९ विषाणू संसर्गाचा पहिल्‍या व दुस-या लाटेतील फैलाव नियंत्रित केल्‍यानंतर आणि कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिल्‍यानंतर, मुंबई महापालिकेने कोविडची संभाव्‍य तिसरी लाट आलीच तर ती तातडीने रोखण्‍यासाठी शक्‍य त्‍या सर्व उपाययोजना केल्‍या आहेत. यामध्‍ये आता भर पडली आहे ती कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या(अँटीबॉडीज कॉकटेल) उपचार पद्धतीची.

(हेही वाचाः न्युमोनियापासून रक्षणासाठी बालकांच्या लसीकरणात नव्या लसीचा समावेश!)

प्रयोग यशस्वी

अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात आतापर्यंत सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्‍णांवर या पद्धतीने उपचार करण्‍यात आले असून, हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरला आहे. हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच(०.५ टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली, तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल ७० टक्‍के घट झाली आहे. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी १३ ते १४ दिवसांवरुन कमी होऊन आता ५ ते ६ दिवसांवर आला आहे.

मुंबई महापालिकेची तयारी

कोविडच्‍या संभाव्‍य तिस-या लाटेसाठी तयारीचा एक भाग म्‍हणून मुंबई महापालिकेने रुग्‍णशय्यांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. तसेच लहान मुलांसाठी स्‍वतंत्र आयसीयूसह रुग्‍णशय्या देखील उपलब्‍ध करुन दिल्‍या आहेत. ठिकठिकाणी रुग्‍णालयांमध्‍ये प्राणवायू निर्मिती प्रक‍ल्प‍ उभे केले जात आहेत. एका बाजूला सेवा-सुविधा वाढवतानाच तिसरी लाट येऊच नये अथवा आली तर ती वेळीच रोखता यावी, यासाठी शक्‍य ती सर्व कार्यवाही केली जात आहे.

(हेही वाचाः मुंबईत १२ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट कधी होणार सुरू?)

कोविडवर मात करण्यासाठी उपचारपद्धती मोलाची

बाधित रुग्‍णांवर यशस्‍वी उपचार करता यावेत आणि मागील दीड वर्ष सातत्‍याने कोविड-१९ विरुद्धच्‍या लढाईमध्‍ये अहोरात्र राबत असलेल्‍या वैद्यकीय मनुष्‍यबळावरील ताण हलका व्‍हावा, म्‍हणून निरनिराळ्या औष‍धोपचारांची चाचपणी महापालिका आरोग्‍य प्रशासनाकडून केली जात आहे. याचाच एक भाग म्‍हणून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात कोविड बाधितांवर उपचारांसाठी करण्‍यात आला आहे. हा प्रयोग अत्‍यंत यशस्‍वी ठरला आहे. महापालिका आयुक्‍त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍यासह राज्‍याचे कुटुंब कल्‍याण आयुक्‍त रामास्‍वामी यांच्‍या पुढाकाराने ही नवीन औषधोपचार पद्धती स्‍वीकारण्‍यात आली आहे. सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार व अधिष्‍ठाता डॉ. बाळकृष्‍ण अडसूळ यांच्‍या निर्देशाखाली त्‍याची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here