करीरोडमध्ये अपघातग्रस्त दुचाकी स्वारांच्या मदतीला धावून आले ‘आपदा मित्र’

135
करी रोड रेल्वे स्थानकाजवळ एका दुचाकीला अपघात होऊन दोन २ व्यक्ती जखमी होतात. त्यातील  एकाच्या नाकातून रक्त येते, तर दुस-या व्यक्तीच्या पायाला मोठा मार लागतो. अशाप्रसंगी एका तरुणीसह ६ तरुण धावत पुढे येतात आणि मदत कार्याला सुरुवात करतात. हे मदत कार्य करताना ते ज्या व्यक्तीच्या नाकातून रक्त येते, त्याच्या नाकातील रक्तस्राव थांबला जावा या पद्धतीने बसायला सांगतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या पायाला मार लागल्याने त्याला उचलताना आणखी दुखापत होऊ नये याची काळजी घेत नजीक पडलेल्या बॅनरची लाकडी पट्टी काढून त्याच्या पायाला आधार म्हणून बांधतात आणि पोलीस आणि रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात.
bmc1 2
अशाप्रकारे अपघात किंवा आपत्कालीन घटना घडल्यास जखमींना कशाप्रकारे हाताळावे याचे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या ‘आपदा मित्र’ अंतर्गत या तरुणीसह तरुणांनी घेतले होते आणि त्यामुळे या अपघातानंतर ते कसलाही विचार न करता ते अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावून जातात. महाविद्यालयीन विद्यार्थीनी रुद्राक्षा होडगरे आणि  आप्पा मनोहर माने, मनिष लाड, विनित जाधव, निखिल परब, अजय लोकरे आणि तन्मय कुसळे ही मदत करणाऱ्यांची नावे असून यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आपदा मित्र या प्रशिक्षणाचा लाभ घेतला होता. त्यातील प्रशिक्षणाच्या आधारे त्यांनी करीरोड येथील दुचाकी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत कार्य केले.
दरम्यान, करीरोड येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना प्रसंगावधान राखत वेळच्यावेळी मदतकार्य करणा-या सर्व ७ आपदा मित्रांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर व प्रमुख अधिकारी  रश्मी लोखंडे यांनी कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. त्याचबरोबर सर्वच आपदा मित्रांनी सतर्क व सजग राहून आणि स्वतःची काळजी घेत गरजूंना मदत करावी, असे नमूद करीत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत! तसेच या सर्व आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्याबाबत समन्वय साधणारे शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक राजेंद्र लोखंडे यांचेही मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

मुंबईतील ५७२ स्वयंसेवकांनी घेतले ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण!

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे जानेवारी २०२३ पासून नियमितपणे १२ दिवसांचे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण देण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत मुंबईतील सुमारे ५७२ स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण  महानगरपालिकेद्वारे देण्यात आले आहे.

आपदा मित्र अंतर्गत काय दिले जाते प्रशिक्षण?

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार देण्यात येत असलेल्या या ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणामध्ये विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे धडे प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह देण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन करणे, पूरपरिस्थितीत बचाव व शोध कार्य करणे यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर आगीची घटना घडू नये किंवा विविध स्वरुपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी; एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेत करावयाचे मदतकार्य याबाबतही अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रासह ओळखपत्रही मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.