नित्यानंद भिसे
नवी दिल्ली – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज पुन्हा नाराज झाला असून रविवारपासून तो रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. सोमवारी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलने केली. अशा परिस्थितीत सरकार काही तरी प्रयत्न करत आहे हे दर्शवण्यासाठी आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला.
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. तसंच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत असंही म्हटलं होतं. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी मोठ्या पीठाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समाधानही व्यक्त केलं. दरम्यान आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यात आल्याने ठाकरे सरकारवर सुरुवातीला बरीच टीका झाली. विरोधकांनीही आरोपांच्या फैरी झाडल्या. तसंच मराठा बांधवांनीही टीका केली. मात्र आम्हाला मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं आहे त्यांच्या न्याय हक्कांसाठी योग्य काय असेल ते करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. तसंच शनिवारीच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठकही पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भात काय पावलं उचलता येतील याबाबत चर्चा झाल्याचे समजले होते. दरम्यान आज सरकारतर्फे अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community