पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या पथ विक्रेत्यांसाठीच्या विशेष सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजनेची मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबवली जात असून आतापर्यंत दहा हजार रुपयांच्या अनुदानासाठी २० हजार फेरीवाल्यांनी अर्ज केला आहे. यातील ९ हजार ८१४ फेरीवाल्यांच्या अनुदानांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यातील ७ हजार ६७३ फेरीवाल्यांना आजमितीस १० हजारांचे अनुदान बँकेमार्फत उपलब्ध करून दिले असल्याची माहिती मिळत आहे.
१०१ शिबिरांचे आयोजन करण्यात आले
कोविड काळामध्ये केंद्र सरकारने ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ या पथविक्रेत्यांसाठीच्या विशेष सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजना जाहीर केली. परंतु मुंबईमध्ये दोन ते अडीच लाख फेरीवाले असतानाही या योजनेची अंमलबजावणी झाल्याचे दिसून न आल्याने केंद्राने सरकारचे कान पिळल्यानंतर महापालिकेने या विशेष सूक्ष्म पत पुरवठ्यासंदर्भात महापालिकेने आता फेरीवाल्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर २०२२ या महिन्यात आतापर्यंत २४ विभागांमध्ये एकूण १०१ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ६ हजार २४१ पथविक्रेत्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या पथविक्रेत्यांना योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली. यापुढेही अशा स्वरुपाच्या शिबिरांचे आयोजन विभाग स्तरावर नियमितपणे करण्यात येणार आहे, अशीही माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याद्वारे (परवाना विभाग) देण्यात आली.
(हेही वाचा अखेर सर्व ३६ जिल्ह्यांना मिळाले पालकमंत्री, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?)
प्रलंबित अर्ज आता निकालात काढण्यास सुरुवात
या योजनेसाठी तब्बल २० हजार फेरीवाल्यांनी अर्ज केला होता. त्यातील आठ हजार अर्जदार असे होते की, जे यापूर्वीच्या सर्वेमध्ये नव्हते. त्यामुळे हे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले होते. हे अर्ज मंजूर करून त्यांना अनुदान दिल्यास त्यांचा हेतू साध्य होईल. म्हणून त्यांची त्यामुळे सर्व प्रकारची माहिती घेतल्यानंतर या फेरीवाल्यांना केवळ या अनुदानासाठी मंजुरी असून त्यानुसार हे सर्व प्रलंबित अर्ज आता निकालात काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांवर महापालिकेने निर्णय घेत मंजुरी दिल्या त्यांना निश्चित केलेल्या पतसंस्थेकडून दहा हजारांचे सुश्म लोन मिळेल. या दहा हजारांच्या अनुदानाची रक्कम परत केल्यास त्यांना दुप्पट अनुदान पुन्हा संबंधित पतसंस्थेकडून तथा बँकेकडून दिले जाणार आहे.
७ हजार ६७३ अर्जदार फेरीवाल्यांना लाभ
यासंदर्भात उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या योजनेतंर्गत एकूण २० हजार अर्ज आले असून त्यातील जे ८ हजार अर्ज प्रलंबित होते, त्याबाबच्या अर्जावर आता निर्णय घेत आता ते मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. या प्रलंबित अर्जांवर निर्णय घेण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत मुंबईत ९ हजार ८१४ अर्ज दहा हजारांच्या अनुदानासाठी मंजुर करण्यात आले असून त्यातील ७ हजार ६७३ अर्जदार फेरीवाल्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जास्तीत जास्त फेरीवाल्यांना या अनुदानाचा लाभ देण्यासाठी महापालिकेच्यावतीने शिबिरे आयोजित करून या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरीवाले आणि शासन यांच्यामध्ये महापालिका नोडल एजन्सी म्हणून काम करत असून ही सर्व रक्कम लाभार्थी फेरीवाल्यांच्या खात्यात थेट जमा होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community