-सचिन धानजी, मुंबई
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती असून या महापालिकेत तब्बल ११ खात्यांचे प्रमुख अभियंता पदांची पदे रिक्त आहेत. या ११ पदांच्या प्रमुख अभियंता पदी सध्या प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ११ खात्यांमध्ये नगर अभियंता आणि जल अभियंता या दोन वैधानिक पदांचा समावेश आहे. या दोन्ही वैधानिक पदांचे प्रमुख अभियंता या पदी अद्यापही कायम अधिकाऱ्यांची नेमणूक न करता या सर्व विभागांचा कारभार तकलादुपणे हाकण्याचा प्रयत्न प्रशासक इकबाल सिंह यांच्याकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासक राजवट असतानाही महापालिकेत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख अभियंता हे प्रभारी राहणे हे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.
मुंबई महापालिकेत बिल्डिंग मेंटनन्स विभाग, मलनिस्सारण प्रचालन विभाग आणि नागरी प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी कायम प्रमुख अभियंता नेमण्यात आले. परंतु नगर अभियंता विभाग, जल अभियंता खाते, रस्ते विभाग, मलनिस्सारण प्रकल्प विभाग, पाणी पुरवठा प्रकल्प विभाग, दक्षता विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग, इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभाग, सागरी किनारा प्रकल्प, मुंबई मलनिस्सारण प्रकल्प आणि विद्युत व यांत्रिक विभाग असे एकूण ११ खाती व विभाग असून त्यांच्या प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी आजही प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे.
(हेही वाचा – उत्तुंग इमारतीतील आगीवर कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह हाय प्रेशर वॉटर मिस्टचा उतारा)
उपप्रमुख पदावरील अधिकाऱ्याला सेवा ज्येष्ठत्यानुसार प्रमुख अभियंता पदी बढती देण्यात येते. डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीने या पदावरील व्यक्तींच्या नावाची सूची तयार करून आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवली आहे. परंतु महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडून या अधिकाऱ्यांच्या नावाला मंजुरी दिली जात नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात उपप्रमुख पदावरील अधिकाऱ्याची प्रभारी प्रमुख अभियंता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परंतु प्रभारी प्रमुख अभियंत्याला कोणतेही अधिकार नसल्याने उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसारच काम करावे लागते. यातील नगर अभियंता आणि जल अभियंता विभागाचे प्रमुख अभियंता ही पदे वैधानिक असून या पदांचे स्व:धिकार आहेत. तसेच ही पदे रिक्त ठेवता येत नसून या पदावर जर प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी प्रशासनाला निश्चित करता येत नाही. नगर अभियंता या पदी अधिकाऱ्याची प्रभारी नियुक्ती असल्यास अभियंत्यांच्या बढती किंवा नियुक्तीचे अधिकार त्यांना राहत नाही.
सध्या महापालिका अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबित राहायचे. पण आता प्रशासकाच्या हाती कारभार असूनही महापालिकेतील अकरा विभागांच्या प्रमुख अभियंता हे पद प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती असणे हे म्हणजे महापालिकेचे सर्वात मोठे दुर्दैव मानले जात आहे. यामुळे महापालिका कारभार हा एक प्रकारे आयुक्तांनी स्वतःच्याच हाती ठेवून केवळ प्रभारी अधिकारी ठेवून ही पदे नाममात्र भरण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांना, या प्रमुख अभियंता पदाच्या अधिकाऱ्यांना कायम न करता त्यांच्या मूळ अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे चहल यांना हे मान्य आहे की कुणाच्या सांगण्यावर ही पदे भरत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community