माहुलच्या पंपिंग स्टेशनच्या जागा अदलाबदलीचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर

90

पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या माहुल येथील पंपिंग स्टेशनकरता आता खासगी विकासकाकडून जागा ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीच्या बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजुरी देण्यात आली आहे. पंपिंग स्टेशनसाठी महापालिका आणि खासगी विकासकांच्या ताब्यातील जागांच्या अदलाबदलीच्या या प्रस्तावांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने भाजपचे सदस्य अभिजित सामंत यांनी बोलण्याची परवानगी मागूनही समिती अध्यक्ष सदा परब यांनी हा प्रस्ताव विना चर्चा मंजूर केला. या प्रस्तावामध्ये विकासकाला लाभ देण्यासाठी प्रशासनासह सत्ताधारी पक्षाचा मोठा हातभार होता आणि त्यामुळेच हा प्रस्ताव चर्चा न करता मंजूर केल्याचे बोलले जात आहे.

पूरपरिस्थिती निर्माण होणा-या प्रमुख ठिकाणांना दिलासा

ब्रिमस्टोवॅड-अंतर्गत पश्चिम उपनगरामध्ये मोगरा पंपिंग स्टेशन व पूर्व उपनगरामध्ये माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय महानगरपालिकेने  घेतला आहे. पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या माध्यमातून मागील ब-याच वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्याला अद्याप यश आलेले नाही. माहुल येथे पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी ‘एम/पश्चिम विभागातील मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आणिक न.भू.क्र. १२/१४ धारण करणारा भूखंड व मेसर्स अजमेरा रिएल्टी इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. यांच्या मालकीच्या आणिक न.भू.क्र. १२/११, १२/१२ या भुखंडांची अदलाबदल करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. या पंपिंग स्टेशनची उभारणी झाल्यास किंग्स सर्कल, गांधी मार्केट, नेहरुनगर आणि सिंधी सोसायटी चेंबूर या पूरपरिस्थिती निर्माण होणा-या प्रमुख ठिकाणांना दिलासा मिळेल, असा दावा प्रशासनाने केला होता.

(हेही वाचा वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्नच! फडणवीसांनी खडसावले सेनेला)

प्रस्ताव सुधार समितीच्या सभेत सादर करण्यात आला

माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी लागणाऱ्या १५५०० चौ.मीटर जागेसाठी अजमेरा यांच्या मालकीच्या नगर भू क्रमांक. १२/११ व १२/१२ यया २८०८२.७० चौ.मीटर एकूण क्षेत्रफळ असलेला भूखंड योग्य आहे. त्यापैकी १५,५०० चौ.मी. जागा पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी आवश्यक असल्याचे कळविले. ही जागा अतिक्रमण मुक्त आहे. या जागेची अदलाबदल झाल्यानंतर महापालिकेकडे येणाऱ्या १३,९९० चौ.मीटर भूखंडाच्या आरक्षणास पावसाळी पाणी पंपिंग स्टेशन, असा बदल करण्यात येईल. आणि मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच कामाला सुरुवात केली जाईल. या जागांच्या अदलाबदल करण्यासाठी महापालिका व खासगी विकासक यांच्यासोबत समंजस्य करार केला जाणार आहे. या कराराच्या अनुषंगाने दोन्ही भुखंडांची अदलाबदल झाल्यानंतर त्यांच्या जागेच्या वापराबाबत विकास आराखड्यात महापालिकेला मिळालेल्या भुखंडावरील उद्यान, बगीचा हे आरक्षण रद्द करून त्यावर पंपिंग स्टेशन हे आरक्षण टाकले जाणार असल्याने या मंजुरी प्राप्त करण्यासाठी हा प्रस्ताव सुधार समितीच्या सभेत सादर करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.