राज्यातील जलमार्गांना मिळणार गती, ‘सागरमाला’ अंतर्गत चार नवीन प्रकल्पांना मंजुरी

केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील चार नवीन जेट्टी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब अपोलो बंदर, जंजीरा बंदर, पद्मदुर्ग बंदर आणि सुवर्णदुर्ग येथील बंदरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील जलमार्गांना गती मिळणार असून, त्याचा लाभ प्रवासी, मालवाहतूक आणि पर्यटकांना होणार आहे, अशी माहिती बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यातील बंदरांचा विकास करण्यासंदर्भात ११ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रीय पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांना भुसे यांनी विनंती केली होती. राज्य सरकारच्या प्रस्तावाला तत्काळ प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी या चारही प्रकल्पांना मंजुरी दिली. सागरमाला प्रकल्पांच्या खर्चामध्ये ५० टक्के खर्च राज्य सरकार आणि ५० टक्के केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारने या चार प्रकल्पासाठी ३१२ कोटी रूपये मंजूर केल्याची माहितीही भुसे यांनी दिली.

(हेही वाचा हिंदु देवतांची टिंगल करणार्‍या वीर दासचा ‘आवाज’ मुंबईतही होणार बंद)

२०२५ पर्यंत पूर्ण करणार

जंजीरा किल्ला (ता. मुरूड) येथे जेट्टी बांधणे आणि जलरोधक (ब्रेक वॉटर) उभारणे, पद्मदुर्ग (ता. मुरूड) आणि सुवर्णदुर्ग (ता. दापोली) येथे जेट्टी बांधणे आणि गेट ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब येथे नवीन जेट्टी उभारणे या सर्व जेट्टी बांधण्याचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला रेडिओ क्लब जेट्टीची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी १०० गाड्यांची पार्किंग व्यवस्था असेल. शिवाय स्कॉयवॉक वे सुद्धा बनविला जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

मुंबईतील वाहतूक कोंडी होणार कमी

गेट वे ऑफ इंडियाजवळ सध्या केवळ पाच प्रवासी बोटी लावता येतात. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने नवीन बंदरावर २० बोटी लावण्याची सोय होईल. यामुळे प्रवासी आणि पर्यटकांची गैरसोय टळणार आहे. शिवाय मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असेही भुसे यांनी सांगितले.

(हेही वाचा राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here