Sion Hospital च्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी; डॉ. जोशी यांच्याकडे आरोग्य विभाग न देण्यामागे हेच कारण?

112
Sion Hospital च्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी; डॉ. जोशी यांच्याकडे आरोग्य विभाग न देण्यामागे हेच कारण?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतल्यांनतर आता दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. १३ व १४ मजल्यांच्या एकूण चार इमारतींचे बांधकाम आणि दोन रुग्णालय इमारतींना जोडणारे पादचारी पूल आदी काम दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येत असून विविध करांसह सुमारे २४६२ कोटी रुपयांच्या प्रकल्प कामाला आचारसंहितेपूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या शीव रुग्णालय (Sion Hospital) इमारतीच्या पुनर्विकासातील गैरप्रकार समोर आणून देत जोशी यांनी याला सहमती दर्शवली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडे आरोग्य विभागाचा भार सोपवल्यास या दुसऱ्या टप्प्यातील कामात त्या अडथळा ठरतील याची भीती असल्यानेच महापालिकेने त्यांच्याकडे आरोग्य विभागाचा भार सोपवला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी असलेल्या डॉ. सुधाकर शिंदे यांना पुन्हा त्यांच्या विभागात पाठवण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील आरोग्य विभागाचा भार अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवला जाईल असे बोलले जात होते. परंतु जोशी यांच्याऐवजी या पदाचा भार अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या रिक्त जागी डॉ. बिपीन शर्मा यांची नियुक्ती झाल्यानंतर बांगर यांच्याकडील आरोग्य विभागाचा भार शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला.

(हेही वाचा – Amit Thackeray : ना भांडुप, ना वरळी; अमित ठाकरेंसाठी माहीमच सरस)

डॉ. जोशी यांनी यापूर्वी महापालिकेत आरोग्य विभागाची पदभार स्वीकारुन त्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून औषध पुरवठादारांना सुतासारखे सरळ केले होते. त्यामुळे डॉ. जोशी पुन्हा महापालिकेत परतल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभाग जाईल असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही आणि डॉ. सुधाकर शिंदे हे परत आपल्या खात्यात गेल्यांनतरही या पदाचा भार डॉ. जोशी यांच्याकडे आला नाही. मात्र, डॉ. जोशी यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार न सोपवण्यामागील कारण आता स्पष्ट होऊ लागले आहे.

महापालिकेच्यावतीने राजावाडी रुग्णालयाचे पुनर्विकास आणि शीव रुग्णालयाच्या (Sion Hospital) दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु होते. डॉ. जोशी या कडक शिस्तीच्या आणि नियमानुसार काम करणाऱ्या असल्याने राजावाडी आणि शीव रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांमध्ये त्या त्रुटी शोधून नियमबाह्य काम करण्यास तयार होणार नाही याच भीतीने डॉ. जोशी यांना आरोग्य विभागाचा भार सोपवला गेला नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या कंत्राटातील गैरकारभार लक्षात येताच जोशी यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यावेळी तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि डॉ. जोशी यांच्यात ठिणगी उडाली होते. त्यामुळे परदेशी यांनी पुढे जोशी यांच्या स्वाक्षरीशिवाय स्थायी समितीपुढे प्रस्ताव आणून मंजुर करून घेतला. पण पुढे हाच प्रस्ताव प्रशासनाला काही कारणास्तव मागे घेण्याची नामुष्की आली होती. आणि त्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव आणून मंजूर केला होता.

(हेही वाचा – भाजपाचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार; मराठवाड्यात Mahayuti ला होऊ शकते मोठे नुकसान)

हा पूर्वेइतिहास शीव रुग्णालयाच्या (Sion Hospital) पहिल्या टप्प्यातील कामाचा असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये डॉ. जोशी यांचा अडथळा नको याच भावनेने त्यांना आरोग्य विभागापासून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. आचारसंहितेपूर्वी २२३५ खाटांची १४ मजली मुख्य इमारत, ५७२ खाटांची १३ मजली इमारत, २१३ खाटांचे १४ मजली इमारत, १३ मजली ओपीडी इमारत तसेच शीव रुग्णालय इमारत ते बराक भूखंड जोडणारे पादचारी पूल अशा स्वरुपाचे काम असणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाचे कामाला प्रशासकांनी मंजूरी दिली आहे. विविध करांसह २४६२ कोटींचा खर्च या पुनर्विकासकरता येणार असून या कामांसाठी एनसीसी लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याशिवाय राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पालाही मंजूरी देण्यात आली आहे.

पूर्व उपनगरांतील राजावाडी रुग्णालयावरील वाढलेला रुग्णांचा ताण लक्षात घेता या रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन रुग्णालय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तळ घर, तळ मजल्यासह १० मजल्यांची इमारत बांधली जाणार असून यासाठी सुमारे ६६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तब्बल १०२० खाटांचे ही रुग्णालय बांधले जाणार आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये शायोना कॉर्पोरेशन कंपनीची निवड करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.