सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेने आधार व्हेरिफाईड फेशियल हे हजेरीचे नवीन तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून नायर रुग्णालय आणि डी प्रशासकीय विभाग कार्यालयातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महापालिकेच्या इतर २५ ठिकाणी ही हजेरी प्रणाली बसवली गेली आहे. याअंतर्गत महापालिका मुख्यालयात दोन आधारे व्हेरिफाईड फेशियल हजेरी मशीन्स बसवण्यात आले. परंतु महापालिका मुख्यालयात चार ते साडेचार हजार कर्मचारी व अधिकारी वर्ग असून त्यासर्वांसाठी मुख्यालय इमारतीत केवळ दोनच मशीन्स आहेत. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या अपुऱ्या मशिन्सअभावी गाड्यांचे टायमिंग चुकू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची बायेमेट्रीक हजेरी बंद करण्यात आल्यानंतर यावर पर्याय म्हणून महापालिकेने आधार व्हेरिफाईड फेशियल हे हजेरीचे नवीन तंत्र अंमलात आणण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार प्रारंभी नायर रुग्णालयात आणि त्यानंतर महापालिकेच्या डी विभाग कार्यालयांमध्ये या हजेरी प्रणालीबाबत नोदणीची प्रक्रिया राबवली. याच्या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या कार्यालयांमध्ये याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फेब्रुवारी २०२२मध्ये यावर निर्णय घेण्यात येणार होता. परंतु त्यावर प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने या हजेरी प्रणालीचा वापर केला जात नव्हता. परिणामी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतील तांत्रिक दोषामुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत होते. त्यानुसार महापालिका मुख्यालयासह २५ ठिकाणी आधार व्हेरिफाईड फेशियल हे हजेरी नोंदवण्याची मशिन्स बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिका मुख्यालयात प्रवेशद्वार क्रमांक २ आणि प्रवेशद्वार क्रमांक ७ याठिकाणी दोन मशिन्स बसवण्यात आले होते.
त्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांची यानुसार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता बायोमेट्रीक मशिन्समधील वारंवारचा बिघाड होत असल्याने कर्मचाऱ्यांचा या व्हेरिफाईड फेशियल मशिनद्वारे हजेरी नोंदवण्याच्या प्रक्रियेला पसंती दिली जात आहे. त्यामुळे या मशिन्सद्वारे हजेरी नोंदवण्यास प्रतिसाद वाढत आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत कर्मचारी या नवीन तंत्राद्वारे हजेरी नोंदवत असल्याने या मशिन्सची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे याठिकाणी असणाऱ्या दोन मशिन्स आता अपुऱ्या पडू लागल्या आहे. सायंकाळी कामावरून घरी जाताना या फेशियल मशिन्ससमोरील कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत जात असल्याने बऱ्याचदा ठराविक लोकल चुकण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. एका बाजुला बायोमेट्रिक मशीन्सची प्रणाली बऱ्याच कार्यालयांमध्ये इंटरनेट सेवेअभावी बंद पडल्या असल्याने या व्हेरिफाईड फेशियल हजेरी प्रणाली जलदगतीने हजेरी नोंदवते. त्यामुळे या प्रणालीचा अवलंब कर्मचारी मोठ्या प्रमाणात करत असून अशाप्रकारच्या मशिन्स अधिक प्रमाणात सर्व प्रवेशद्वाराजवळ बसवण्याची मागणीही कर्मचारी वर्गांकडून केली जात आहे.
(हेही वाचा – Girish Mahajan : एकनाथ खडसेंना १० मंत्रीपदे घेताना काही वाटले नव्हते का? – गिरीश महाजनांचा टोला)
या एका मशिन्सवर सरासरी ५०० कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवणे अपेक्षित असून याठिकाणी असलेल्या सुमारे चार ते साडेचार हजार कर्मचारी व अधिकारी वर्गांसाठी आठ मशिन्स बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेशमार्ग क्रमांक ०२, ०६, ०७ आणि ०३ या ठिकाणी प्रत्येकी दोन मशिन्स बसवण्यात यावे अशी मागणीही कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे बायोमेट्रिक मशीनच्या तुलनेत व्हेरिफाईड फेशियल मशिन्सची किंमत माफक असून मुख्यालयातील ९० टक्के कर्मचाऱ्यांची यासाठी आवश्यक असणारी नोंदणीही पूर्ण झाल्याने एचआर विभाग किंवा मुख्यालय इमारत देखभाल विभागाच्या वतीने या मशिन्स बसवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community