Ganeshotsav 2023 : श्री गणेश मूर्ती आगमन – विसर्जन मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीला वेग
वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत आगमन व विसर्जन मार्गावर झाडे पडून किंवा फांद्या पडून दुर्घटना घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्याच्या सूचना
मुंबईत पावसाळ्यापूर्व करण्यात येणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम जवळपास पूर्ण केल्यानंतर आता महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने श्री गणेशोत्सवाकरता गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्व झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणीचे काम दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी जोरात सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबईत रस्त्यालगत १ लाख ९२ हजार ५५९ एवढी झाडे असून त्यातील १ लाख ५४ हजार १९३ झाडांचा सर्वे करण्यात आले. त्यातील १ लाख ०४ हजार ७०झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याची गरज असल्याने पावसाळ्यापूर्वी जूनपर्यंत ८९ हजार २३० झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पावसाळ्यात उर्वरीत झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे कामही पूर्ण केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक फांद्या आणि धोकादायक झाडे उन्मळून पडण्याच्या प्रत्येकी सरासरी ५०० दुर्घटना घडत असतात.
त्यामुळे श्री गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील धोकादायक झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या यांची पुन्हा पाहणी करून छाटणी करण्याचे निर्देश महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त बैठकीत प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या सूचनेनुसार या झाडांच्या फांद्यांची पुन्हा एकदा छाटणी केली जात आहे. त्यामुळे मुंबईतील बऱ्याच मार्गावर पुन्हा एकदा झाडांच्या फांद्यांची छाटणी करून गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्ग सुरक्षित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.(हेही वाचा –Food Delivery Boys : 30 टक्क्यांपेक्षा जास्त डिलिव्हरी बॉय्’ज पदवीधारक )
उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्यापूर्वीची मुंबईतील सर्वेनुसार झाडांच्या धोकादायक फांद्यांची तसेच धोकादायक झाडांची छाटणी झालेली आहे. परंतु गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे समन्वयक असलेल्या परिमंडळ दोनच उपायुक्त यांच्यासोबत झालेल्या वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत या आगमन व विसर्जन मार्गावर झाडे पडून किंवा फांद्या पडून दुर्घटना घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मार्गाचा आराखडा सादर केला जात आहे, त्या नुसार त्या त्या रस्त्यांवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. ज्यामध्ये मोठ्या गणेश मूर्तीची उंचीला अडथळा ठरणाऱ्या तसेच प्रकाश योजनेला अडसर ठरणाऱ्या शिवाय भविष्यात पावसात ही झाडे पडून वाहनांचे नुकसान होऊ नये किंवा झाड पडून वाहतुकीला अडथळा होऊन नये, ही बाब लक्षात घेवून झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. या माध्यमातून श्री गणरायाच्या आगमन व विसर्जनाचे मार्ग सुरक्षित राखण्याच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या टप्प्यात फांद्या छाटणीचे काम सुरु असल्याचे परदेशी यांनी सांगितले.