- नमिता वारणकर
दररोजच्या स्वयंपाकासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे पदार्थ ते म्हणजे कांदा आणि टोमॅटो! गेल्या काही महिन्यांपासून कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाली. टोमॅटो दीडशे ते तीनशे रुपये किलोने विकला जात होता. त्यापाठोपाठ कोथिंबीर, मेथीची जुडी चाळीस ते पन्नास रुपयांना विकली गेली. विविध भाजीपाला तसेच कडधान्यांच्या किमतीतही सातत्याने दरवाढ होतच आहे. आता कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले. उत्पादक, ग्राहक आणि शेतकरी या सगळ्यांनाच चिंतेत टाकणारा हा विषय. जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणारी दरवाढ, बेरोजगारी, सर्वसामान्यांचे कोलमडलेले बजेट, किंमतीच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम. एकंदरीतच महागाईच्या उडालेल्या या भडक्याचा समाजातील सर्व घटकांवर येणारा आर्थिक ताण, यामागची कारणे आणि त्यावर तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना यांचा लेखाच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा.
सध्या देशात खरीपातील पिकांची पेरणी सुरू आहे. शेतकरी मशागतीला लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये खरीप पिकांची आवक सुरु होईल. सध्या रब्बी कांद्याची खरेदी सुरु आहे. रब्बी पिकातून आवक सुरु आहे. खरीपाच्या कांद्याची लागवड सुरु असून ऑक्टोबर महिन्यात पीक हाती येईल. रब्बी पिकांचा पुरवठा अजून काही महिन्यानंतर राहिल. पण त्यानंतर खरीपाचे पीक येईपर्यंत किंमतीत चढउतार होतो. दरवर्षी हा अनुभव येतो. कांदा सडू नये आणि अधिक काळ टिकावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परमाणु ऊर्जा विभाग आणि भाभा परमाणु अनुसंधान केंद्र या दोन संस्था त्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरु आहे. महाराष्ट्रातील लासलगावमध्ये कोबाल्ट-६० मधून गामा रेडिएशनसह १५० टन कांद्यावर प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा अधिक काळ टिकणार आहे.
भारतात नेपाळ आणि इतर बाहेरच्या देशातून आयात केलेले टोमॅटो बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. टोमॅटोच्या मालाला उठाव कमी झालाय. ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नसल्याने देशभरात टोमॅटोचे दर ५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली येतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ११ हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक झाली. टोमॅटोसह कांदा, काकडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, कारले या फळभाज्यांच्या दरात घट झाली. तसेच निर्यातशुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरातही घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रेत्यांनी टोमॅटोच नाही, तर इतर भाज्यांच्या किंमतीतही सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : काश्मीर-अरुणाचलमध्ये जी-20 बैठका घेणे हा आमचा अधिकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती )
ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी देशात कांद्याच्या साठ्याबाबत दिलेल्या माहितीनुसार, केंद्राने ३ लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या बंपर स्टॉकपेक्षा हा आकडा २० टक्के अधिक आहे. त्यामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारद्वारे कांद्याचा मागचा अनुभव लक्षात घेऊन कांद्याचा मोठा साठा करण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा फटका
अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला. त्यामुळे कांद्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली. एपीएमसी मार्केटमध्ये आज कांद्यासाठी एक किलोला २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. किरकोळ बाजारात कांदा ४० ते ५० रुपयांना विकला जात आहे, त्यामुळे टोमॅटोनंतर आता कांदा सर्वसामान्यांसह गृहिणींना जपून वापरावा लागणार असल्याचे दिसते. येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला सध्या किंमत मिळते आहे. यापूर्वी चांगला भाव नसल्याने शेतकरी कांदा शेतामध्येच फेकून देत होते. तेव्हा शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता, मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून थोड्या फार प्रमाणात कांद्याला बाजारभाव मिळत आहे ते चांगलेच आहे. येणाऱ्या काळात देखील कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे कांद्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणारी आवक देखील घटलेली आहे. या सर्व गोष्टीमुळे कांद्याचे दर वाढले आहेत. येणाऱ्या काळात देखील हे दर असेच चढते राहणार असल्याचे व्यापारी दिगंबर राऊत यांनी सांगितले.
एफएमसीजी कंपन्यांवर परिणाम
टोमॅटो आणि कांदा हे भारतीय पाककृतीतील महत्त्वाचे पदार्थ. केचअप, सॉस खाण्यासाठी टोमॅटो मुख्य घटक, तर सलाडमध्येही कांदा आणि टोमॅटो हवेच. त्यामुळे कंपनीचे नुकसान कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना खूश करण्यासाठी एफएससीजी कंपन्यांनाही अनेक धोरणांची अंमलबजावणी करावी लागली.
पॅकेट साईझ कमी करणे
एफएमसीजी कंपन्या अनेकदा किंमत स्थिर ठेवताना लहान पॅकेटमध्ये उत्पादनांची संख्या कमी करतात. यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या बजेटमध्ये उत्पादनाची खरेदी करता येते. कमी किंमतीत एखादा पदार्थ ग्राहक खरेदी करू शकतात.
सवलत दूर करणे
मोठ्या पॅकेजवरील जाहिराती आणि सवलती काढल्या. त्यामुळे मूळ किंमतीत (एमआरपी) उत्पादनाची विक्री होते.
उत्पादन व्यवस्थापन
वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी एफएमसीजी कंपन्या किंमतीच्या चढ-उताराप्रमाणे आपल्या उत्पादनाची निर्मिती कमी जास्त प्रमाणात करतात. जेव्हा खर्च अव्यवहार्य होतो तेव्हा उत्पादन थांबवतात. टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाल्याने ‘मॅक्डोनल्ड’ने त्यांच्या बर्गर आणि इतर पदार्थांत टोमॅटोचा वापर करणार नसल्याचे जाहीर केले. फास्ट फूड पुरवणाऱ्या इतर काही ब्रॅंड्सनीदेखील त्यांच्या पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला. एका टोमॅटो विक्रेत्याने त्याच्याजवळील टोमॅटोच्या रक्षणासाठी चक्क रक्षक ठेवले, तर दुसऱ्या एका घटनेत ग्राहकाने विक्रेत्याला टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतींबद्दल विचारले असता, विक्रेत्याने त्याला चक्क टोमॅटो फेकून मारला!
टोमॅटो दरवाढीचे कारण …
सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमतीत वाढ होतेच; पण यंदा ही वाढ गगनाला भिडली आहे. या वाढीमागे प्रामुख्याने तीन कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे तापमानवाढ आणि हवामानबदल, दुसरे म्हणजे अनियमित आणि अवकाळी पाऊस आणि तिसरे म्हणजे दक्षिण भारतात टोमॅटोच्या पिकाला झालेला रोगाचा प्रादुर्भाव. तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे टोमॅटोची भाववाढ ऑगस्टपर्यंत खाली उतरली असली तरीही सध्या एकूणच फळभाज्यांची आवक घटली असल्याचे चित्र आहे.
किंमती वाढण्यामागचे अजून एक मुख्य कारण म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील टोमॅटोच्या पिकाला झालेला रोग. तापमानवाढ आणि पाऊस यामुळे बंगळुरूमध्ये एका विशिष्ट प्रजातीच्या पांढऱ्या, छोट्या किड्यांची वाढ झाली. पोषक वातावरणामुळे हे किडे झपाट्याने झाडांवर पसरले. बंगळुरूमधील ५० टक्के टोमॅटोच्या पिकांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगामुळे टोमॅटोच्या दर्जात घसरण झाली आणि किंमती वाढायला लागल्या. दक्षिण भारतातून उर्वरित भारताला टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. त्यात उत्तर भारतात पडलेल्या अवकाळी पावसामुळेदेखील दक्षिण भारतातून टॉमेटो आयात करण्याचे प्रमाण वाढले. टॉमेटो ही लवकर खराब होणारी, नाशवंत फळभाजी आहे. शीतगृहांमध्येही ते जास्त काळ टिकू शकत नाहीत, ही एक मोठी समस्या आहे.
भारत सरकारची ‘ऑपरेशन ग्रीन्स’ योजना
भारतात हवामानाच्या संदर्भाने अन्न सुरक्षेच्या बाबतीत काही विशेष योजना नाहीत. त्यामुळे अराजकतेची परिस्थिती निर्माण होते आणि सर्वसामान्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो. अन्नधान्याची पुरवठा साखळी आणि पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याची पुढील काळजी या आपल्यापुढील महत्त्वाच्या समस्या आहेत. भारत सरकारची ‘ऑपरेशन ग्रीन्स’ या योजनेअंतर्गत TOP ही योजना आहे. TOP म्हणजे टोमॅटो, ऑनियन आणि पोटॅटो. या तिन्ही भाज्या भारतीयांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या भाज्या आहेत. या योजनेचे उद्दिष्ट असे की, या घटकांची पुरवठा साखळी मजबूत आणि कार्यक्षम करणे तसेच काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे, हे आहे. या योजनेअंतर्गत टॉमेटो, कांदा आणि बटाट्याच्या लागवडीपासून साठवणुकीपर्यंतच्या होणाऱ्या वाहतूक खर्चावर ५० टक्के अनुदान दिले जाते. ही योजना कुठे फसते आहे, याचे उत्तर सरकारने शोधावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community