रमेश शिंदे
भारताला बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक, प्र. के. अत्रे आदी पत्रकारांचा श्रेष्ठ वारसा आहे. असे असताना आज न्यूजक्लिकसारख्या एका न्यूज पोर्टलद्वारे चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची दलाली घेऊन भारतविरोधी पत्रकारिता केली जाते, हे आजच्या पत्रकारितेला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अशा पत्रकारांवर अटकेची कारवाई केली. त्यावर पुरोगाम्यांनी हा पत्रकारितेवरील आघात आहे, अशी ओरड सुरु केली आहे. असे असेल तर न्यूजक्लिकच्या पत्रकारांनी चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची देणगी का स्वीकारली? कशाच्या बदल्यात या निवडक पत्रकारांना चीनकडून देणगी देण्यात आली? हे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत.
भारतामध्ये पूर्वी नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या काळात भांडवलशाही अमेरिकेचा विरोध म्हणून कम्युनिस्ट हे रशियाद्वारे पोषित राजकारण आणि पत्रकारिता करत होते, अशी ग्वाही केजीबी या रशियन गुप्तचर यंत्रणेच्याच काही गुप्तचरांनी दिली होती. आता हेच वामपंथी पुरोगामी पत्रकार राष्ट्रहिताची पत्रकारिता करणाऱ्यांना गोदी मीडिया असे संबोधत आहेत. यावरून अलगदपणे भारताशी सर्व स्तरावर उघडपणे शत्रुत्व घेणाऱ्या चीनच्या कुशीत जाऊन पत्रकारिता करत असल्याचे उघड झाले आहे. या तथाकथित पुरोगामी पत्रकारांवर ईडीने धाड घालून न्यूज क्लिकचे संपादक प्रबिर पूरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटक देखील केली आहे. अन्य ४६ जणांचे नाव चौकशीच्या फेऱ्यात आहे. आतापर्यंतचा अनुभव आहे की, ईडीने केलेली चौकशी ही पुराव्यानिशी असते आणि ईडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला सहजासहजी सुटत नाही. या वेळी पहिल्यांदाच गद्दार पत्रकार उघड झाले आहेत. त्यांचा पर्दाफाश पुरोगाम्यांना आवडणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सनेच केला होता.
चीन धार्जिणे लिखाण
मूळचा भारतीय असणारा आणि सध्या चायनीज सिंघम बनलेला अमेरिकन उद्योजक नवीन रॉय सिंघम हा चीनमधून आपला व्यापार चालवत आहे. तो चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा समर्थक आहे आणि योगायोगाने त्यानेच न्यूज क्लिकच्या पत्रकारांना लाखो रुपयांचे फंडिंग केलेले आहे. चीन हा भारतविरोधी कारवाया प्रत्येक क्षेत्रात करत असतो. डोकलामसारखी घटना असो किंवा लडाखच्या भागात भारतीय जवानांशी केलेली हातापायी असो अथवा अरुणाचल प्रदेशमधील स्टेपल विजा देणे असो किंवा भारताच्या उत्तर भागातील सीमेवरून हिमालयातून पाकिस्तानला जोडणारा महामार्ग काढणे असो, तसेच श्रीलंकेवरती दबाव आणून श्रीलंकेच्या बंदरात स्वतःचे गुप्तचर माहिती गोळा करणारे जहाज स्थायिक करणे असो, यातील प्रत्येक घटना भारताच्या सुरक्षेशी संबंधित आहे. अशा वेळी काँग्रेसचे नेते चीनच्या नेत्यांशी खासगी भेटी घेतात आणि पुरोगामी पत्रकार चीनकडून मिळालेल्या पैशांच्या बदल्यात भारतविरोधी आणि चीनच्या हिताची पत्रकारिता करून जागतिक स्तरावर भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र करत असतात. यात न्यूज क्लिकच्या पत्रकारांनी राफेल घोटाळ्याच्या संदर्भात केलेले लिखाण असो किंवा अदानीच्या व्यवसायाच्या विरोधात केलेले लिखाण असो तसेच शेतकरी आंदोलन, सीएएचे आंदोलन, कोविडच्या काळात भारतातील आरोग्य व्यवस्था कशी मागासलेली आहे अशा पद्धतीचे लिखाण असो, नेहमीच त्यांचे लिखाण भारत आणि भारत सरकारच्या विरोधात असते. याउलट जगभरात कोरोनाचा व्हायरस पसरवणाऱ्या आणि लाखो लोकांचे बळी घेणाऱ्या चीनने मात्र कोरोनावर कशी प्रभावीपणे मात केली, अशा पद्धतीचे चीन धार्जिणे लिखाण या डाव्या विचारांचे पत्रकार करत होते.
भारत तोडण्याचे षडयंत्र
२००९ मध्ये स्थापन झालेली न्यूजक्लिक २०१७ पर्यंत आर्थिकदृष्ट्या तोट्यामध्ये असते आणि अचानक चीनच्या लाखो रुपयांच्या आर्थिक सहाय्यानंतर ती चर्चेत येते, यातच काहीतरी काळेबेरे असल्याचे स्पष्ट होते. पत्रकारिता ही निष्पक्ष आणि निर्भीड असायला हवी, मात्र ज्यांनी पेनातील शाई चीन सारख्या शत्रू राष्ट्राला विकलेली असेल, त्यांच्याकडून वेगळ्या पत्रकारितेची अपेक्षा संभवत नाही. आज न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीला आव्हान देणारे न्यूज क्लिकचे पत्रकार जेव्हा अमेरिकेत हिंडनबर्गचा अहवाल उघड झाला, त्यावेळी त्याला डोक्यावर घेऊन नाचत होते, अशा बेजबाबदार पत्रकारितेमुळे भारताला आणि अदानी समूहाला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. भारताचा तोटा झाल्यामुळे निश्चितच चीनसारख्या शत्रू राष्ट्राला आनंद होणार आणि त्यामुळेच न्यूजक्लिक सारख्या बातमी देणाऱ्या पोर्टलने हिंडनबर्गच्या अहवालाला उचलून धरले. आज अभिसार शर्मा असो वा न्यूज क्लिकसोबत जोडलेला कोणताही पुरोगामी पत्रकार असो त्याला चिनी सिंघमकडून लाखो रुपये नेमके कशाच्या बदल्यात मिळाले याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे देशद्रोही वामपंथी गद्दार पत्रकारांची चौकशी होणे हा काही पत्रकारितेवरचा आघात म्हणता येणार नाही. चौकशीतून उद्या नेमके काय बाहेर येईल हे स्पष्ट होणारच आहे. एकीकडे या कम्युनिस्ट विचारांचे विद्यार्थी जेएनयू सारख्या युनिव्हर्सिटीमधून ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपये घेऊन भारत विरोधी बातम्या पेरत आहेत, हे भारत तोडण्याचे षडयंत्र आहे, त्यामुळे या षडयंत्रात सहभागी असणाऱ्यांची चौकशी तर व्हायलाच हवी, मात्र त्यांना न्यायालयापुढे नेऊन कठोर शिक्षा देणे हे देखील तितकेच आवश्यक आहे, तेव्हाच पाकिस्थान, चीन सारख्या देशांना ‘आपल्याला आता भारतात आश्रय मिळणार नाही’, याची खात्री पटेल.
(लेखक हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)
Join Our WhatsApp Community