रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित यंत्राच्या माध्यमातून जलवाहिनीमधील गळती, सांडपाणी वाहिनीमधील कचरा, गाळ काढण्याचे काम होते. त्यामुळे माणसाला ड्रेनेजमध्ये उतरावे लागणार नाही. यामधून खूप मोठा सामाजिक प्रश्न सुटणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) हे एक वरदान असून यातून प्रगती होऊन मानवी जीवन सुकर होणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील यांनी केले.
पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज पाईप लाईन्स) ची प्रगत रोबोटिक्स तंत्रज्ञानाने तपासणी करण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेने खरेदी केलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते मिरज येथे करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, मे. सोलिनास इंटिग्रिटी चेन्नई चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवांशु कुमार आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, सांडपाणी वाहिनीमध्ये काही अडथळे निर्माण झाल्यास माणसाला त्यामध्ये आत उतरून काम करावे लागते. तेथील गॅसमुळे माणसाच्या जीवाला धोका पोहोचतो, अशा दुर्दैवी घटना घडतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज), जलवाहिनी (पाणीपुरवठा पाईप लाईन) मधील बिघाड दुरूस्त होणार आहे. असे अद्ययावत तंत्र महापालिकेने आणल्याबद्दल महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले. या अद्ययावत यंत्राच्या देखभालीची काळजी घ्यावी. तसेच देखभाल दुरूस्ती हमी काळात देयकाची काही रक्कम राखून ठेवावी, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली. हे सांगताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे यशस्वी दाखले दिले.
पाणीपुरवठा व सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज लाईन) सुस्थितीत ठेवणे व सांडपाणी वाहते करण्याकरिता रोबोटचा उपयोग होणार आहे. पाणीपुरवठा वाहिनीमध्ये चोकअप झाल्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होते. अशा तक्रारीचे निराकरण करणेसाठी जलवाहिनीमध्ये आतील बाजूस रोबोट जावून लाईनच्या सद्यस्थितीची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. त्यामुळे जुन्या गळत्या शोधणे व नियमित पाणीपुरवठा कार्यरत ठेवण्यासाठी एन्डोबोट (रोबोट) घेतल्यामुळे लाईन्स खराब होवून खड्डे पडण्याबाबत अगोदरच माहिती मिळणार आहे त्यामुळे जीवित व वित्तहानी होणार नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाचे एन्डोबोट (रोबोट) अत्याधुनिक पध्दतीचे असून महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व मलनि:सारण विभागाकडे एकूण 6 रोबोट खरेदी करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत 5 कोटी 83 लाख 15 हजार रूपये इतकी आहे. त्याच्या 3 वर्षासाठी देखभाल दुरुस्तीसाठीचे काम मे. सोलीनस इंटीग्रिटी प्रा.लि. चेन्नई या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यावेळी दिवांशु कुमार यांनी रोबोटिक तंत्राबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. (Chandrakant Patil)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community