22 मार्चपासून सुरु झालेली इंधन दरवाढ अद्याप थांबलेली नाही. दिवसेंदिवस वाढणा-या या इंधन दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधन भरणे खिशाला परवडणारे नसल्याने, आता लोक भन्नाट मार्ग शोधून काढत आहेत. गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी असल्याने महाराष्ट्रातील वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमापार रांगा लावताना दिसत आहेत.
थेट गाठले गुजरात
गुजरातमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 106.35 पैसे, तर सीएनजी प्रतिकिलो 76.98 आहे. पालघरच्या तुलनेत सुमारे 9 रुपयांनी हे दर कमी आहेत. त्यामुळे वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी सीमेपलिकडे जाण्यास पसंती देत आहेत. नागरिक वाहनात पेट्रोल भरण्यासह कॅन किंवा प्लास्टिक बाटलीत भरुन सोबत नेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत पैशांची बचत होत आहे.
( हेही वाचा: एकमेकांवर आरोप करणा-या राऊत आणि सोमय्यांची संपत्ती आहे तरी किती ? )
पुन्हा एकदा गुजरातमध्ये रांगा
- इंधन भरण्यासाठी उंबरगाव, संजाण येथे रांगा लागत असल्याने, तासनतास वाया जातो. तर दैनंदिन रोजगारावर परिणाम होत असल्याची खंत रिक्षांसह अन्य वाहनचालकांनी बोलून दाखवली.
- पंपावर गर्दी वाढल्याने अतिरिक्त ताण वाढून वाहनांच्या व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्यावे लागत असल्याचे तेथील पंपचालकांचे म्हणणे आहे.
- लसीकरणावेळी महाराष्ट्राबाहेर गुजरातेत अधिक सेंटर असल्याने पूर्वी येथील नागरिकांच्या रांगा त्या राज्यात दिसल्या होत्या. या आठवणींना उजाळा मिळाला आहे.