जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात धुडगूस घालणा-या पावसाने यंदाच्या आठवड्यात आता ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी केवळ पालघर, नाशिक आणि पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट आहे. राज्यातील उर्वरित कोणत्याही भागांत पावसासाठी यलो अलर्ट नाही. बहुतांश भागांत पावसाचे शिडकावे किंवा थोडाफार पाऊस होईल.
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. पावसासाठी पोषक ठरलेला गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील द्रोणीय पट्टा (कमी दाबाचा प्रकार) विरुन गेला आहे. परिणामी, आता राज्यात मुसळधार पावसाची शनिवारपर्यंत शक्यता नाही. मंगळवारी कोकणासह संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची संततधार राहणार नाही. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत एखाद-दुस-या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांत गुरुवार ते शनिवार मुसळधार पावसासाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत शुक्रवार-शनिवार मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट राहील. वीकेण्डच्या अगोदर शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. परभणीत गुरुवारपासूनच मेघगर्जना सुरु होतील. या पूर्वानुमानात बदलही केला जाईल. गुरुवारपासून दिलेल्या पूर्वानुमानात थोडाफार बदल होण्याचीही शक्यता आहे.