साकी विहार रोड आणि आदि शंकराचार्य मार्गावर पवई तलावाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे आधी कोविडमुळे दोन वर्षे बंद आणि त्यातच या उद्यानातील सर्व विद्युत दिवे बंद पडल्यानंतरही त्याच्या देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नव्हते. याबाबत स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेताच महापालिकेच्या संबंधित विभागाने प्रतिज्ञापत्रच सादर करत या उद्यानाची कामे हाती घेण्याचे आश्वासन देत त्यासाठीची कामे तातडीने हाती घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सामान्य माणसांनी तक्रार केल्यानंतरही दखल न घेणाऱ्या प्रशासनाला न्यायालयाने धाक दाखवताच कामे हाती घ्यावी लागल्याने लाथों कें भूत बातोंसे नहीं मानते असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
पवईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे ४८ एकर असून त्यापैंकी १२ एकर उद्यानाच्या जागेचा विकास सन २००६-०७मध्ये करून हे उद्यान सर्वांसाठी खुले करून देण्यात आले होते. हे उद्यान महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारित येत नसून महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अखत्यारित येत आहे. या उद्यानांमध्ये मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. परंतु कोविड १९च्या काळातील महामारीमुळे दोन वर्षे हे उद्यान बंद होते. परंतु कोविडची लाट संपल्यानंतर पुन्हा हे उद्यान खुले करण्यात आले होते. उद्यान बंद राहिल्यामुळे या उद्यानाची दुरावस्था झाली होती. याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने राज्य मानवी हक्क आयोगाने महापालिके विरोधात सु मोटो दाखल केला होता.
(हेही वाचा – BMC : अनंत चतुर्दशीसाठी महापालिकेची अशी जय्यत तयारी)
त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागाने पवई उद्यानातील आवश्यक ती दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यात येतील असे राज्य मानवी हक्क आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले होते. सन २००६-०७ नंतर या उद्यानाची कोणत्याही प्रकारची मोठी कामे न केल्याने दुरावस्था झालेल्या या उद्यानाची विद्युतीकरणाची तसेच संलग्न कामे सहायक अभियंता नगरबाह्य विभाग (प्रमुख जलवाहिनी) विभागाच्या माध्यमातून अखेर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामांमध्ये एकूण २५५ विद्युत खांब आणि त्यातील दिवे तसेच सी. सी. टिव्ही कॅमेरे व उद्यानात पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युत पंप बसण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या कामांसाठी जुलै महिन्यांमध्ये महापालिकेने निविदा मागवली होती, ही निविदा आता अंतिम झाल्यानंतर यातील पात्र कंपनीची निवड केली आहे. उणे सोळा टक्के दराने हे काम देण्यात आले असून यासाठी विविध करांसह ४.१८ कोटी रुपये खर्च केले जणार आहे. या कामांसाठी साई इलेक्ट्रीकल्स अँड इंजिनिअर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community