मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांवरून राजकारण तापलेले असताना आता सत्ताधारी पक्षच टार्गेट होऊ लागल्यानंतर खड्डयांच्या पाहणीसाठी खुद्द विभागांच्या सहायक आयुक्तांनाच रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी आपापल्या प्रशासकीय विभागांमध्ये स्वतः फिरुन खड्डे भरण्याची कार्यवाही योग्यपणे होत असल्याची खातरजमा करावी,असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.
मुंबई महानगरातील रस्त्यांवरील खड्डयांच्या समस्यांबाबत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मार्गदर्शन करत ९ एप्रिल २०२१ ते आजपर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यांवर आढळलेले सुमारे ४० हजार खड्डे भरण्यात आले आहेत. असे असले तरी मुंबईतील सुमारे १४७ किलोमीटर लांबीचे प्रकल्प रस्ते आणि दोष दायित्व कालावधीतील सुमारे ६२५ किलोमीटर रस्ते अशा एकूण ७७२ किलोमीटर रस्त्यांचे परिरक्षण योग्यरित्या होण्यासाठी संबंधित कंत्राटदार/मध्यवर्ती यंत्रणा यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत, यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
(हेही वाचा : खड्ड्यांबाबत आयुक्तांची तारीख पे तारीख)
एक हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची भीती या व्यतिरिक्त राहिलेले म्हणजे सुमारे १ हजार ०८७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी युद्ध पातळीवर कार्यवाही हाती घ्यावी. सर्व प्रशासकीय विभागातील रस्ते अभियंत्यांनी आपापल्या हद्दीतील प्रत्येक रस्त्यावर स्वतः प्रत्यक्ष फिरुन किती खड्डे आहेत, ते भरुन काढण्यासाठी किती साहित्य लागेल, याची माहिती संबंधित सहायक आयुक्तांना एका दिवसात सादर करावी.
खड्डे दिसताच एक दिवसांत भरा!
सहायक आयुक्तांनी आवश्यक कोल्डमिक्सची मागणी तात्काळ रस्ते विभागाकडे नोंदवावी. मागणी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रशासकीय विभागांना ताबडतोब कोल्डमिक्स व इतर आवश्यक सर्व साधनसामुग्रीचा २ दिवसांच्या आत पुरवठा करण्यात यावा. रस्त्यांवर खड्डे निदर्शनास येताच ते भरुन काढण्याची कार्यवाही एका दिवसात पूर्ण झाली पाहिजे. सर्व सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी आपापल्या प्रशासकीय विभागांमध्ये स्वतः फिरुन खड्डे भरण्याची कार्यवाही योग्यपणे होत असल्याची खातरजमा करावी.
पुढील २ ते ३ आठवडे जलद गतीने आणि चांगला समन्वय ठेवला तर खड्ड्यांविषयी समस्या निकाली काढता येईल. जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर सातत्याने रस्ते अभियंता व सहायक आयुक्तांनी लक्ष ठेवावे.
– आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)
खड्डे कामांचा आढावा
सर्व परिमंडळांचे सह आयुक्त व उप आयुक्त यांनीही खड्डे भरण्याच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधित सहायक आयुक्त, रस्ते अभियंते यांना मार्गदर्शन करावे. तसेच अडचणीचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा. एखाद्या समस्येवर मार्ग निघत नसेल तर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अथवा प्रमुख अभियंता (रस्ते) यांच्याशी थेट संपर्क करावा, असेही निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
(हेही वाचा : हसन मुश्रीफ सोमय्यांना का म्हणाले, ‘हे वागणं बरं नव्ह!’)
Join Our WhatsApp Community