मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामे मोठया प्रमाणात सुरू असून संबंधित कंत्राटदारांनी मालमत्ताकर (Property Tax) भरावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. मागील १९ मार्च २०२४ रोजी या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विहीत कालावधीत मालमत्ता कर भरावा म्हणून करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. यंदा मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट कमी होणार असल्याने आता महापालिकेने थकबाकीदारांचा शोध घेतानाच मेट्रो रेल्वेच्या कंत्राटदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केले आहे.
मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्टींग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर (Property Tax) भरण्याची करारनाम्यानुसार जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर आहे. परंतु, कंत्राटदारांकडून विलंब होत असल्याची बाब उघड झाली आहे. अखेरीस, मेसर्स एचसीसी – एमएमसी, मेसर्स सीईसी – आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल अॅण्ड टी स्टेक या कंत्राटदारांना मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील आठ ते नऊ वर्षांपासून मेट्रो रेल्वेची ही कामे सुरू असून तेव्हापासून या कंत्राटदार कंपनीकडे कधीही न पाहणाऱ्या महापालिकेला आता या कंत्रादारांकडील कराच्या थकीत रकमेची आठवण झाली.
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाइतके मालमत्ता कर (Property Tax) गोळा करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी, २८ मार्च २०२४ दुपारी ३ वाजेपर्यंत २ हजार ३९८ कोटींची कर वसुली झाली आहे. सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
२८ मार्च रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी
- मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – ९८ कोटी ९२ लाख ४१ हजार २४१ रुपये
- मेसर्स सीईसी – आयटीडी (एफ उत्तर विभाग) – ९५ कोटी ६० लाख ७ हजार ४४३ रुपये
- मेसर्स डोगा सोमा (एफ उत्तर विभाग) – ९४ कोटी ३९ लाख ८१ हजार ४२१ रूपये
- मेसर्स एल अॅण्ड टी स्टेक (एफ उत्तर विभाग) – ८२ कोटी १२ लाख ८४ हजार ७१४ रुपये
- निर्मल लाईफस्टाईल (टी विभाग) – ४० कोटी ६५ लाख ८३ हजार ७८५ रुपये
- विधी रिअॅलिएटर्स (पी उत्तर विभाग) – १६ कोटी ९५ लाख ८ हजार ९१९ रूपये
- जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (पी उत्तर विभाग) – १६ कोटी ३० लाख २५ हजार ४३२ रुपये
- रॉयल रिअॅलिएटर्स (पी उत्तर विभाग) – ४ कोटी ४४ लाख ४८ हजार १२० रुपये
- मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – ४ कोटी ७ लाख ६३ हजार ४१९ रुपये
- राधा कन्स्ट्रक्शन (पी उत्तर विभाग) – २ कोटी ९० लाख ७४ हजार ३८७ रुपये
Join Our WhatsApp Community